टीम इंडियाचा अनुभवी विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आपल्या अनुभवाची उपयुक्तता आज पुन्हा एकदा दाखवून दिली. दिनेश कार्तिकची ६६ धावांची खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक याच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने २० षटकात १८९ धावांपर्यंत मजल मारली. संघाची अवस्था ५ बाद ९४ अशी असताना कार्तिक मैदानात आला आणि त्याने शाहबाजच्या साथीने नाबाद ९७ धावांची भागीदारी केली. याच डावात त्याच्या तुफानी खेळीचा फटका मुस्तफिजूर रहमानला बसला. त्याच्या षटकात कार्तिकने तब्बल २८ धावा चोपल्या.
बंगलोरचे सलामीवीर अनुज रावत (०) आणि डु प्लेसिस (८) स्वस्तात बाद झाले. विराट कोहली (१२) आणि प्रभुदेसाई (६) देखील झटपट माघारी परतले. पण त्यानंतर मॅक्सवेलने शाहबाज अहमदच्या साथीने डाव सावरला. मॅक्सवेलने ३४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावा केल्या. तो बाद झाल्यावर दिनेश कार्तिकने जबाबदारी स्वीकारली. फटकेबाजीला सुरूवात करताच त्याचा हेतू स्पष्ट झाला. त्यामुळे अचूक यॉर्कर टाकणाऱ्या मुस्तफिजूरला १८वे षटक देण्यात आले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कार्तिकने त्याच्या ओव्हरमध्ये ४, ४, ४, ६, ६, ४ अशी फटकेबाजी करत तब्बल २८ धावा कुटल्या. पाहा व्हिडीओ-
कार्तिक आणि शाहबाज जोडीने तुफानी खेळी केल्या. कार्तिकने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावा कुटल्या. तर शाहबाजने २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ३२ धावा केल्या.