Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs RR: राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या अटीतटीच्या लढतीत मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने थरारक विजय मिळवला. जोस बटलरच्या ७० धावांच्या बळावर RR ने २० षटकात ३ बाद १६९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना RCBची अवस्था ५ बाद ८७ झाली होती. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि शाहबाद अहमद या दोन फलंदाजांनी संपूर्ण सामनाच पालटला. दिनेश कार्तिकने दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिल्यानंतर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.
१७० धावांचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डू प्लेसिस (२९), अनुज रावत (२६), विराट कोहली (५), डेव्हिड विली (०) आणि शेरफाने रूदरफर्ड (५) हे पाच खेळाडू झटपट बाद झाले. पण शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिकने दमदार फलंदाजी केली. शाहबाज अहमद २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार मारून ४५ धावांवर बाद झाला. पण दिनेश कार्तिकने शेवटपर्यंत खिंड लढवत संघाला विजय मिळवून दिला. त्याने २३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४४ धावा केल्या. त्याच्याबद्दल हर्षा भोगलेंनी खूप छान ट्वीट केलं. "दिनेश कार्तिक, तुझं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. (राजस्थान विरूद्धची) तुझी फलंदाजी अप्रतिम होती. आता असं म्हणावं लागेल की, दिनेश कार्तिक मैदानात असेल तर तो नकारात्मक विचारांना थाराच नाही", असं ट्वीट त्यांनी केलं.
दिनेश कार्तिकने या आधीच्या सामन्यात देखील फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. शेवटच्या षटकात ७ धावा शिल्लक असताना त्याने पहिल्या दोन चेंडूत दोन मोठे शॉट्स खेळून सामना संपवला होता.
दरम्यान, मंगळवारच्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. जोस बटलरने आपली दमदार फलंदाजीची लय कायम ठेवत ७० धावा केल्या. विशेष म्हणजे त्याच्या खेळीत सर्व षटकारांचाच समावेश होता. देवदत्त पडीकलने ३७ धावांची केळी केली. तर शिमरॉन हेटमायरने राजस्थानच्या डावात फिनिशरची भूमिका चोख बजावली. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ४२ धावा केल्या.
Web Title: Dinesh Karthik praised by Harsha Bhogle after match winning performance in RCB thrilling victory over Rajasthan Royals IPL 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.