नवी दिल्ली-
क्रिकेटमध्ये नवं फॉर्मेट येणार आहे का? वनडे क्रिकेटमध्ये बदल होणार आहेत का? आता ४०-४० षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आताच देणं कठीण असलं तरी बदल होणार असल्याचे संकेत मात्र दिले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मतानुसार आता वनडे क्रिकेटला जीवंत ठेवायचं असेल तर त्यात बदल करणं गरजेचं आहे. त्यांनी सल्ला दिला आहे की आता ५० ऐवजी ४०-४० षटकांचे सामने खेळवले जावेत. शास्त्रींना या विधानाला दिनेश कार्तिकनंही पाठिंबा दिला आहे.
दिनेश कार्तिक म्हणाला की वनडे क्रिकेटचं आकर्षण आता कमी होऊ लागलं आहे आणि यंदाचा वनडे वर्ल्डकप कदाचित शेवटचा ५० षटकांचा वर्ल्डकप ठरू शकतो. आता रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक असं का म्हणत आहेत यामागची पार्श्वभूमी समजून घेणं देखील महत्वाचं आहे.
रवी शास्त्री म्हणाले वनडे क्रिकेट बदलून टाका
वनडे क्रिकेटचं अस्तित्व टिकून राहावं असं वाटत असेल तर भविष्यात सामने ४०-४० षटकांचे खेळवावे लागतील. "मी हे यासाठी सांगतोय कारण आम्ही जेव्हा १९८३ साली वनडे वर्ल्डकप जिंकलो होतो तेव्हा सामने ६० षटकांचे खेळवले जायचे. त्यानंतर लोकांचं आकर्षण कमी झालं आणि सामने ५० षटकांचे झाले. आता मला वाटतं की हे सामने ४० षटकांचे करण्याची वेळ आली आहे. काळानुसार बदल करणं गरजेचं आहे", असं रवी शास्त्री म्हणाले.
वनडे क्रिकेट कंटळवाणं बनलंय- कार्तिक
दिनेश कार्तिकने रवी शास्त्रींचं म्हणणं पुढे नेत म्हटलं की लोकांना कसोटी क्रिकेट पाहायचं आहे जे क्रिकेटचे सर्वोत्तम स्वरूप आहे. लोक मनोरंजनासाठी T20 पाहतात पण ५० षटकांचा खेळ कंटाळवाणा होऊ लागला आहे. लोकांना ते ७ तास बसून बघायचे नाही. त्यामुळे कदाचित भारतात होणारा वनडे वर्ल्डकप यंदाचा शेवटचा ५० षटकांचा खेळवला जाईल. आता रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक यांचं म्हणणं खरं होणार का? आणि आयसीसी यावर काय विचार करते हे येणारा काळच सांगेल.
Web Title: dinesh karthik ravi shastri bats for odi format change 50 overs world cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.