कोलंबो : कुठल्याही स्थितीमध्ये दिनेश कार्तिक नेहमी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज असतो. त्याचा अनुभव व अनेक फटके खेळण्यात माहिर असल्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये तो भारतासाठी आदर्श खेळाडू ठरतो, अशा शब्दात भारतीय कर्णधार रोहित शर्माने कार्तिकची प्रशंसा केली.
यष्टिरक्षक फलंदाज कार्तिकने (८ चेंडूत नाबाद २९ धावा) बांगलादेशविरुद्ध रविवारी रात्र निधास ट्रॉफी तिरंगी टी-२०च्या फायनलमध्ये अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला जेतेपद पटकावून दिले.
विजेतेपदानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला,‘तो
दक्षिण आफ्रिकेच्या गेल्या दौऱ्यात आमच्यासोबत होता. तेथे त्याला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. फायनलमधील कामगिरीमुळे भविष्यासाठी त्याचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, त्याचा स्वत:वर विश्वास आहे. तो वरच्या फळीत खेळो
अथवा तळाच्या फळीत पण, कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास तो सज्ज असतो. अशा प्रकारचा खेळाडू संघात आम्हाला पाहिजे असतो.’
वरच्या क्रमांकावर फलंदाजीला न पाठविण्यात आल्यामुळे कार्तिक नाराज होता, असा खुलासा करणाºया भारतीय कर्णधाराने त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याच्या निर्णयाची पाठराखण केली.
रोहित म्हणाला,‘ज्यावेळी मी बाद झालो आणि डगआऊटमध्ये बसलो होतो त्यावेळी कार्तिक त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला न पाठविल्यामुळे नाराज होता. पण, मी त्याला सांगितले की, तू आमच्यासाठी मॅच फिनिशर आहेस. अखेरच्या तीन-चार षटकांमध्ये तुझ्या कौशल्याची गरज भासेल. त्यामुळे मी १३ व्या षटकात बाद झाल्यानंतर त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नाही पाठविले. तो माझ्यावर नाराज होता, पण अनुकूल निकालासह सामना संपविल्यामुळे आता तो खूश आहे.’
कार्तिकची प्रशंसा करताना रोहित म्हणाला,‘त्याच्याकडे असलेले फटके बघता डेथ ओव्हर्समध्ये मॅच फिनिश करण्यासाठी तो आदर्श खेळाडू आहे. डेथ ओव्हर्समध्ये ३० यार्डच्या वर्तुळात फाईन लेग, मिड आॅफ किंवा शॉर्ट थर्ड मॅन या पोझिशनवर क्षेत्ररक्षक ठेवावे लागतात. रुबेल हुसेनविरुद्ध त्याने अखेरच्या षटकात मारलेले फटके तो नेहमी खेळू शकतो. त्याला त्याची माहिती आहे. मुस्ताफिजुर रहमान १८ किंवा २० वे षटक टाकेल असे मला वाटले होते. त्यामुळे अनुभवी फलंदाज असणे आवश्यक होते.’
रोहित पुढे म्हणाला,‘आम्हाला माहिती आहे की, तो आॅफ कटर टाकेल. अशा स्थितीत दिनेश सर्वोत्तम पसंतीचा खेळाडू होता. तो आपल्या राज्य संघातर्फे व मुंबई इंडियन्सतर्फे अशा प्रकारची भूमिका बजावत असतो.’
वाशिंग्टन सुंदर व यजुवेंद्र चहल यांनी या स्पर्धेत सर्वाधिक प्रत्येकी ८-८ बळी घेतले. रोहितने सुंदरची प्रशंसा केली.
रोहित म्हणाला,‘माझ्या मते या स्पर्धेत सुंदरची गोलंदाजी आमच्यासाठी प्लस पॉर्इंट ठरली. नव्या चेंडूने त्याने चमकदार कामगिरी केली. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्याचे दडपण प्रत्येकच खेळाडू स्वीकारू शकत नाही. त्याचसोबत त्याने बळीही घतेले. त्याने कुठल्याही प्रतिस्पर्धी फलंदाजाला पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्याची संधी दिली नाही.’
सुंदर मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणे आव्हान असते, असे त्याने सांगितले. वॉशिंग्टन सुंदर पुढे म्हणाला, ‘लहान वयात अशा प्रकारचा पुरस्कार पटकावल्यामुळे विशेष आनंद झाला. पॉवर प्ले सामन्यात निर्णायक ठरत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करणे आव्हान असते, पण ज्यावेळी आपण आपल्या देशाकडून खेळतो त्यावेळी ही सन्मानची बाब ठरते.’
आक्रमकता योग्य, आम्हाला रोबोट नको : ब्रेट ली
कोलंबो : भावना व आक्रमकता खेळाचा
एक भाग असून मैदानावर मला रोबोट बघायला आवडणार नाही, पण आपले वर्तन मर्यादा ओलांडणारे नसावे, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने व्यक्त केली.
आॅस्ट्रेलियाचा सध्याचा दक्षिण आफ्रिका दौरा मैदानावरील वादामुळे चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडावर दुसºया कसोटी सामन्यादरम्यान आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला खांद्याचा धक्का दिल्याप्रकरणी दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्याने याविरुद्ध अपील केले आहे.
लीच्या मते नियंत्रित आक्रमकता खेळासाठी चांगली असते. भारत व बांगलादेशविरुद्ध कोलंबोमध्ये तिरंगी टी-२० मालिकेच्या अंतिम लढतीपूर्वी बोलताना ली म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला मैदानावर रोबोट बघणे आवडणार नाही. खेळाडूंनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. तुम्ही कुणावर वर्णद्वेषी शेरेबाजी करायला नको. तुम्ही कुणाविरुद्ध अपशब्दाचा वापर करायला नको.’
Web Title: Dinesh Karthik is ready for any challenge - Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.