Dinesh Karthik IND vs SA T20: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा चौथा टी२० सामना ८२ धावांनी जिंकला. भारतासाठी जरी हा विजय खूप मोठा असला तरी भारतीय संघाने सुरूवातीला चाहत्यांना निराश केले होते. दिनेश कार्तिकची २७ चेंडूत ५५ धावा आणि हार्दिक पांड्याची ३१ चेंडूत ४६ धावांची खेळी रंगल्यामुळे भारताला ६ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारता आली. दिनेश कार्तिकने भारतीय संघाच्या डावाला योग्य वेळी गती दिली आणि संघाला मोठी धावसंख्या गाठण्यासाठी मदत केली. २०१९ नंतर ३ वर्षे दिनेश कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता, पण IPL 2022 मधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. या यशामागचं गमक काय याबद्दल त्याने माहिती सांगितली.
सामन्यानंतर हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी हार्दिकने विचारले की, दिनेश कार्तिकने स्वतःमध्ये असा कोणता बदल केला, ज्यामुळे लोकांना 'नवा दिनेश कार्तिक' बघायला मिळत आहे. तू बडोद्या मध्ये क्रिकेटचा भरपूर सराव केला होता, ज्याबद्दल फार लोकांना माहिती नव्हती. तू तुझी क्रिकेटकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलली? याबाबत दिनेश कार्तिकने सांगितले, "मी पूर्णपणे निश्चय केला होता की मला टी२० विश्वचषक खेळायचा आहे. मी बऱ्याच काळापासून माझ्या खेळावर काम करत आहे. कारण मला माहिती आहे की संघातून वगळण्यात आल्यावर कसं वाटतं. टीम इंडियासाठी खेळणं खूप मोलाचं आहे. त्यामुळे त्या विचारांनी मला बळ दिलं."
"रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मला एक भूमिका आणि व्यासपीठ दिलं. मी माझ्या खेळावर तेथे फोकस करू शकलो. मी या मॅचफिनिशर या उद्देशानेच खेळलो. मी माझ्या संघासाठी सामने जिंकू शकेन असे सामने मला खेळायला मिळाले आणि अशी परिस्थिती उद्भवली तर ते माझ्यासाठी खूप खास असेल हे मला समजलं. मी हा संघ बाहेरून पाहिला आहे. मला माहित आहे की संघात जागा मिळवणं किती कठीण आहे. संघातील खेळाडूंमध्ये भरपूर प्रतिभा आहे. युवा खेळाडू देखील चांगले खेळत आहेत आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. मी अनेक लोकांसोबत क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे मला अजून आत्मविश्वास मिळाला आहे", असेही कार्तिकने सांगितले.
Web Title: Dinesh Karthik reveals to Hardik Pandya about efforts he had taken to transform into match finisher IND vs SA T20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.