WPL Auction | नवी दिल्ली : सध्या सर्वत्र महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. यंदा दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतीय महिला संघ आगामी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. नुकताच भारताच्या अंडर-19 महिला संघाने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेची सुरुवात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होईल. सर्व सामने दक्षिण आफ्रिकेच्या तीन स्टेडियममध्ये खेळवले जातील. केपटाउन, पार्ल आणि गेबेरा या मैदानांवर हे सामने पार पडतील.
दरम्यान, या स्पर्धेतील भारतीय संघाचा सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध 12 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी महिला प्रीमियर लीगचा लिलाव (WPL Auction) होणार आहे. म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी WPL साठी महिला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या 5 फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिनेश कार्तिकचं भारी उत्तर
अशातच भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक मोठे विधान केले आहे. कार्तिकने ट्विटरवर #ASKDK च्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी एका चाहत्याने कार्तिकला विचारले की, "WIPL मध्ये RCB साठी तुम्ही किती उत्साहित आहात? तुम्हाला रेड आणि गोल्ड मध्ये कोणता 1 भारतीय आणि 1 विदेशी खेळाडू पाहायचा आहे?." या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दिनेश कार्तिकने म्हटले, "मी महिला प्रीमियर लीगसाठी खूप उत्साहित आहे. चाहते देखील या स्पर्धेचा आनंद घेतील. एलिसा हिली आणि स्मृती मानधना यांना आरसीबीमध्ये खेळताना पाहायला आवडेल."
12 तारखेला भारत विरूद्ध पाकिस्तान रणसंग्राम
महिला प्रीमियर लीगच्या लिलावाच्या एक दिवस आधी ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होणार आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी महिला प्रीमियर लीगचा लिलाव होणार आहे. ट्वेंटी-20 विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व कर्णधारांच्या पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, "लिलावापूर्वी आम्हाला एक महत्त्वाचा सामना खेळायचा आहे आणि आम्ही फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करत आहोत. विश्वचषक हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा आहे. आमचे लक्ष्य आयसीसी ट्रॉफी हे आहे. या गोष्टी येतच राहतील आणि एक खेळाडू म्हणून तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे आणि तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्यावी हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे WPL लिलाव असूनही भारतीय संघाचे लक्ष पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यावर आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Dinesh Karthik says he would love to see Smriti Mandhana and Alyssa Healy play in RCB's team in the Women's Premier League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.