- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर अहमदाबाद येथील नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुलाबी चेंडूने खेळला जाणारा कसोटी सामना दोन दिवसात संपल्यामुळे खेळपट्टी पाच दिवसाच्या सामन्याच्या लायकीची नसल्याची टीका होत आहे. याबाबत जाणकारांची मते दोन गटात विभागल्या गेली आहेत.
मायकल वॉन व दिलीप वेंगसरकर यांच्या मते, २२ यार्डची खेळपट्टी पूर्णपणे तयार झाली नाही. फलंदाजांवर हा अन्याय असून कसोटी क्रिकेटच्या भविष्यासाठीही चुकीचे आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता सुनील गावसकर, केव्हिन पीटरसन, जेफ्री बॉयकॉट यांच्या मते, खेळपट्टीपेक्षा सुमार फलंदाजीमुळे हे घडले आहे.
खेळपट्टीबाबत ही एक आकर्षक चर्चा आहे. पण, सामन्यात काय घडले यावर युक्तिवाद होतो, पण आतापर्यंत मालिकेत घडलेल्या इतर बाबींचा अर्थ वेगळा आहे. खेळपट्टी दर्जेदार नव्हती, यात शंकाच नाही. सामन्यात दोन दिवसात ३० विकेट पडल्या आणि १४२.२ षटकात सामना संपला. १९३५ नंतर हा सर्वात लवकर संपलेला सामना ठरला. खेळपट्टी जर झाकलेली नसेल तर त्यावर वातावरण अधिक परिणाम करते. दोन्ही संघातील फलंदाजांची कामगिरी बघता, खेळपट्टी हा घटक महत्त्वाचा ठरतो.इंग्लंडने पहिल्या डावात केवळ ११२ धावा केल्या आणि त्यापेक्षाही दुसऱ्या डावात त्यांची कामगिरी ढेपाळली. त्यांचा दुसरा डाव ८१ धावात संपुष्टात आला. भारताचा पहिला डावही १४५ धावात आटोपला. ७ विकेट एका सत्रापेक्षा कमी कालावधीत गमावल्या. कामचलाऊ फिरकीपटू ज्यो रुटने भारताचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
फ्लडलाईट लागण्यापूर्वीच सामना संपला होता. सामना निर्धारित कालावधीपूर्वी संपणे नवे नाही. बरेच कसोटी सामने अखेरच्या षटकापर्यंत रंगत नाहीत किंवा पाचव्या दिवसाच्या अखेरच्या तासापर्यंतही चालत नाहीत. काही रंगतदार सामने ३-४ दिवसात संपतात.वातावरण, खेळपट्टी, फ्लॅडलाईट, परिस्थिती आणि बाह्य मैदान या प्रकारच्या लढतीत आपली छाप सोडत असतात. खेळाडूही संयम, आक्रमकता, कौशल्य याचा प्रभाव सोडतात. एखाद्या गोष्टीकडे चुकीच्या पद्धतीने लक्ष वेधल्या गेले तर ती गोष्ट चर्चेत राहते. खेळपट्टी जर खराब असेल तर उभय संघांसाठी फलंदाजी म्हणजे लॉटरी ठरते. खेळपट्टीमुळे जर कौशल्य हरवीत असेल तर कसोटी क्रिकेटची रंगत ओसरते.
मोटेरावर नाणेफेकदेखील महत्त्वाचा मुद्दा ठरला असता. येथे २२५-२३५ धावा इंग्लंडसाठी मोलाच्या ठरू शकल्या असत्या. पण असे घडले नाही. २ बाद ७३ वरून घसरगुंडी होणे हा मानसिकतेशी जुळलेला मुद्दा असल्याचे मत नासिर हुसेन याने व्यक्त केलेच आहे. दुसऱ्या डावातही काही वेगळे चित्र नव्हते. सकारात्मकवृत्तीचा अभाव जाणवला. गोलंदाजांचा सामना करण्याचे धैर्य दिसलेच नाही. फलंदाज आल्यापावली फिरत असतील तर संघाचे पतन अटळ असते. अहमदाबादची खेळपट्टी इंग्लिश संघाला कर्दनकाळ वाटली असेलही, पण नाउमेद होण्यापासून ते स्वत:ला सावरू शकले नाहीत, हे देखील सत्य आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता तांत्रिक उणिवांमुळे इंग्लंड अपयशी ठरला. चुकांपासून बोध घेण्याची असमर्थता त्यामुळे चर्चेचा दुसरा पैलूही सुसंगत भासतो. पहिला सामना तब्बल २१७ धावांनी जिंकल्यानंतर काही कारणास्तव इंग्लंड बॅकफूटवर गेला. रोटेशन प्रणाली हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळेच खेळाची सूत्रे भारताच्या हातात आली असावीत. चेन्नईत दुसऱ्या कसोटीत जे घडले त्याचीच काहीशी पुनरावृत्ती तिसऱ्या सामन्यात झाली. त्यासाठी इंग्लंडदेखील कारणीभूत आहे. ॲन्डरसनसारख्या पहिल्या सामन्यात प्रभावी ठरलेल्या गोलंदाजाला विश्रांती देण्याची काहीच गरज नव्हती. फलंदाजांची देहबोलीदेखील आश्चर्यकारक होती. सुरुवातीला द्विशतकी खेळी करणारा रुट अचानक अश्विनसारख्या फिकरीपटूपुढे नांगी टाकू लागला.