नवी दिल्ली :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर सोमवारी दिवसभर चर्चा रंगली ती रोहित शर्माच्या कर्णधारपदाची. टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडणार असल्याचे वृत्त एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने दिले.
त्यानंतर सोशल मीडियावर रोहित कर्णधार बनणार असल्याच्या चर्चांना रंगत आली. मात्र, ‘अद्याप कर्णधारपदाच्या विभाजनाबद्दल चर्चा झालेली नसून या अफवा आहेत,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. याआधी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनीला मार्गदर्शक नेमून बीसीसीआयने आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे संघात मोठे बदल होणार असल्याच्या चर्चांनाही ऊत आला. कर्णधारपदाबाबत बदल करण्याचा निर्णय झाला, तर कोहलीकडे कसोटी संघाचे, तर रोहितने मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्त्व देण्यात येईल, असेही म्हटले जात आहे. सोशल मीडियानुसार टी-२० विश्वचषकानुसार कोहली आणि रोहित यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी विभागून देण्यात येणार आहे.