Join us  

कसोटी क्रिकेटवर होणार चर्चा

आयसीसी कार्यकारिणी आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात गुरुवारी बैठक होणार असून त्यात कसोटी क्रिकेटच्या भविष्यासह विश्व क्रिकेटच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर चर्चा होणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:24 AM

Open in App

नवी दिल्ली : आयसीसी कार्यकारिणी आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात गुरुवारी बैठक होणार असून त्यात कसोटी क्रिकेटच्या भविष्यासह विश्व क्रिकेटच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर चर्चा होणार आहे. आयसीसी कार्यकारिणी नीती निश्चित करते आणि त्यानंतर सलंग्न सदस्यांकडून (सदस्य देश, प्रायोजक) त्यावर प्रतिक्रिया घेते.या बैठकीमध्ये बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी, कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि सीईओ राहुल जोहरी यांना आयसीसी कार्यकारी समूहाच्या प्रगतीबाबत माहिती देण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी आव्हानांबाबत चर्चा होणार आहेत. त्यात कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कायम राखणे, चाहत्यांना आकर्षित करण्याची पद्धत आणि टी-२० ची वाढती लोकप्रियता यावर बैठकीमध्ये चर्चा होईल. सर्व हितधारकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेनंतर आयसीसी कार्यकारी समूह विस्तृत अहवाल तयार करेल.दिवस-रात्र कसोटीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी वेस्ट इंडिजविरुद्ध गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्याच्या बाजूने असल्याची सर्वांना कल्पना आहे. त्याला सुरुवातीला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची सहमती होती. पण, आता भारतीय संघ व्यवस्थापनाने प्रशासकांच्या समितीला (सीओए) सांगितले की, प्रकाशझोतात कसोटी सामना खेळण्यासाठी किमान १८ महिन्यांचा वेळ मिळणे आवश्यक आहे.कसोटी सामन्याकडे प्रेक्षक पाठ फिरवित असल्याचे दृश्य आयसीसीसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे दिवस-रात्र कसोटीच्या बळावरच कसोटी क्रिकेट वाचविता येईल, असे सर्वसाधारण मत आहे. काहींच्या मते जगभर कसोटी सामन्यांची सुरुवात गुरुवारी व्हायला हवी. कसोटी सामन्यात तिसरा व चौथा दिवस महत्त्वाचा मानला जातो आणि आठवडा अखेर असल्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहचतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :बीसीसीआय