India vs Pakistan, 2023 ODI World Cup : तुम्ही आशिया चषक स्पर्धेच्या नाटकात आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) नाटकं सुरू केली आहेत. भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यानंतर भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्यावर चर्चा सुरू झाली असताना आता पाकिस्तानलाही वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात यायचे नाही. त्यामुळे त्यांचे सामने बांगलादेशमध्ये खेळवण्यात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे आणि BCCI ने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास कोणतीच अडचण होणार नाही, अशी हमी ICC ला दिलेली आहेत. पण, PCB ने तुम्ही येत नाहीत, तर आम्हीही येणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. त्यात आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानला मिळालेले आहेत. पण, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी कोणत्याही परिस्थितीत संघ पाकिस्तानात पाठवणार नाही हे सांगितले आहे. त्यामुळे भारताचे सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय जवळपास निश्चित होत आहे. हाच मॉडल आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वापरला जाणार आहे.
दुबईत पार पडलेल्या बैठकीत हा विषय चर्चेत आला. अजून त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही, परंतु PCB त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त ESPN cricinfo ने दिले आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारताने जो पर्याय निवडला आहे, तोच पर्यात आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान पाकिस्तान वापरणार आहे. याचा परिणाम २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरही होताना दिसू शकतो. या स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानला मिळालेले आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठीचा पर्याय आशियाई क्रिकेट परिषदेने मान्य केला आहे, परंतु भारताचे सामने नेमके कुठे खेळवायचे यावर अंतिम निर्णय झालेला नाही. त्यासाठी संयुक्त अरब अमिराती, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड असे पर्यात समोर आहेत. त्यामुळेच PCB ने वन डे वर्ल्ड कपसाठी हाच प्रस्ताव वापरावा असा प्रस्ताव ठेवला आहे. ५ ऑक्टोबरपासून वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे.
"मला माहित नाही की भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील की नाही, परंतु पाकिस्तान त्यांचे सामने भारतात खेळणार नाही. मला वाटते की आशिया चषक स्पर्धेप्रमाणेच पाकिस्तानचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने तटस्थ ठिकाणी आयोजित करावे लागतील", असे आयसीसी अधिकारी वसीम खान यांनी एआरवाय न्यूजला सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"