मुंबई : ‘कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉनच्या प्रकोपामुळे संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सध्या आफ्रिकेत या विषाणूमुळे परिस्थिती बिकट झाली असली तरी येत्या काही दिवसांत आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत बीसीसीआय स्पष्ट भूमिका मांडेल, अशी आशा आहे,’ असे भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले. शुक्रवारपासून भारत व न्यूझीलंडदरम्यान वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे. त्याआधी कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कोहलीने म्हटले की, ‘याप्रकरणी शक्य तितक्या लवकर गोष्टी स्पष्ट होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंशी चर्चाही केली. प्रशिक्षक द्रविड यांनी संघात याबाबत चर्चा सुरु केली असून, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत काहीही होऊ शकते. खेळावरील लक्ष हटणार नाही, याची आम्हाला खात्री आहे.
अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याचे संकेतदुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळविण्याचे संकेत देताना कोहली म्हणाला की, ‘वातावरणात बदल झाला असून, यादृष्टिने संघात काही बदल करण्यात येतील. पाचही दिवस असेच ढगाळ वातावरण राहील, याची शाश्वती नाही. त्यामुळे विविध परिस्थितीनुसार योग्य मारा करण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजांना खेळवावे लागेल.’
साहा तंदुरुस्त!कर्णधार कोहलीने अनुभवी यष्टिरक्षक रिद्धिमान साहा तंदुरुस्त असल्याची माहिती दिली. पहिल्या कसोटीत मानेच्या दुखापतीमुळे साहाने अधिक वेळ यष्टिरक्षण केले नव्हते. त्याच्या अनुपस्थितीत के. एस. भरतने यष्टिरक्षण केले होते. कोहलीने म्हटले की, ‘आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार साहा तंदुरुस्त आहे.
कोहलीने पुढे म्हटले की, ‘आम्ही बोर्डसोबत चर्चा करत असून, आम्हाला विश्वास आहे की, एक-दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. आपण सामान्य परिस्थितीत खेळणार नसल्याची जाणीव सर्वांना आहे. त्यामुळे अनेक योजना आखाव्या लागतील, तसेच तयारीही करावी लागेल.’- विराट कोहली.