लंडन : आयसीसीच्या नियमानुसार भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार्ली डीनला धावबाद केले, हे वैध आहे. मात्र, त्यानंतर इंग्लिश खेळाडू नाखूष आहेत. काही लोकांनी समर्थन केलेले असले, तरी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यासारखे खेळाडू नाखूष झाले आहेत. भारतीय महिला संघाने शनिवारी लॉर्डसमध्ये तिसरा सामना १६ धावांनी जिंकला. तसेच तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विपदेखील दिला. त्यानंतर जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी हिला शानदार निरोप दिला.
दीप्तीने नॉन स्ट्राइकवर गोलंदाजी करताना आधीच पुढे गेलेल्या चार्ली डीन हिला धावबाद केले. त्यामुळे भारताला सामना जिंकण्यात यश आले. चार्ली डीन तेव्हा ४७ धावांवर खेळत होती. इंग्लंडला विजयासाठी १७ धावांची गरज होती. मात्र, धावबाद नियमानुसार असले तरी इंग्लंडचे खेळाडू नाखूष होते. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने ट्विट केले की, ‘माझ्या मते अशा पद्धतीने बाद करणे योग्य नाही. अशा पद्धतीने सामना जिंकणे पसंत करणार नाही. मी वेगळा विचार करून खूष आहे.’
जेम्स अँडरसन याने म्हटले की,‘मी कधीही समजू शकत नाही की खेळाडूंना अशा पद्धतीने बाद करण्याची गरज का पडते.’
या धावबादचे काही खेळाडूंनी समर्थनही केले. वीरेंद्र सेहवाग याने म्हटले की, इतक्या इंग्रजांना एकदाच हरताना पाहणे खूपच मजेशीर आहे. तसेच भारतीय टीमने विजय मिळवत झुलन गोस्वामीला शानदार निरोप दिला.’ आर. अश्विन यानेदेखील धावबादचे समर्थन केले आहे. त्याने म्हटले की, असे काय झाले की अश्विनला ट्रेंडिंग करत आहात. दीप्ती शर्मा ही आजच्या सामन्याची नायिका आहे.’
आम्ही गुन्हा केला नाही - हरमनप्रीत
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले की, ‘आमच्या संघाने कोणताही गुन्हा केलेला नाही. हा खेळाचा भाग आहे आणि आयसीसीच्या नियमानुसारदेखील आहे. मला वाटते की खेळाडूंनीही त्याचे समर्थन करायला हवे. मला वास्तवात आनंद आहे की ती याबाबत सजग होती. फलंदाज खूपच पुढे निघून गेली होती. मला वाटत नाही की आम्ही काही चुकीचे केले आहे. सुरुवातीचे नऊ विकेट खूपच महत्त्वाचे असतात. आणि त्यासाठी आम्ही मेहनत घेतली. गोलंदाजांनी खूपच चांगली गोलंदाजी केली आणि पूर्ण संघाने चांगले प्रयत्न केले. आता फक्त अखेरच्या बळीबद्दल चर्चा करण्याऐवजी आनंद साजरा करायला हवा.’
बळी गोलंदाजाला मिळायला हवा : अश्विन
भारताचा आघाडीचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने म्हटले की, जेव्हा बॉल फेकला जाण्याच्या आधी नॉन स्ट्राईकर एन्ड सोडून फलंदाज पुढे जातो तेव्हा आणि धावबाद होतो तेव्हा समजदारी आणि चलाखी दाखवल्याबद्दल गोलंदाजाला हा बळी मिळायला हवा. इंग्लंडच्या सॅम बिलिंग्ज याने ट्वीट करून अँडरसनला विचारले की, ‘कल्पना करा, की तुम्हाला किती बळी मिळाले असते.’ अश्विन याने त्याला उत्तर दिले. ‘दबावाच्या क्षणी विकेट घेण्यात दाखवलेली समजदारी आणि विकेट घेतल्यावर होणाऱ्या टीकेचा सामना करण्यासाठी गोलंदाजाच्या खात्यात हा बळी जमा करायला हवा.’
Web Title: Dismissals done by Deepti are as per rules But the English player is unhappy india vs england womans match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.