भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याची गणना क्रिकेट जगतातील आतापर्यंतचा सर्वात आक्रमक सलामीवीर म्हणून होते. आज टी-२० क्रिकेटमुळे आक्रमक फलंदाजांची संख्या वाढत असली तरी वीरेंद्र सेहवागने त्याच्या कारकिर्दीत एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये जी आक्रमकता दाखवली तिला तोड नाही. त्यामुळेच वीरूने खेळलेल्या अनेक अविस्मरणीय खेळींची आजही आठवण काढली जाते. दरम्यान, देशभरात दिवाळीचा उत्साह असताना आयसीसीने वीरेंद्र सेहवागला दिवाळीचं खास गिफ्ट दिलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीनं वीरेंद्र सेहवागच्या क्रिकेट कारकिर्दीचा गौरव करताना त्याचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. आयसीसीने वीरेंद्र सेहवागसोबत भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी आणि श्रीलंकेचे महान फलंदाज अरविंद डि’सिल्व्हा यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. या तिन्ही क्रिकेटपटूंच्या समावेशानंतर आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेल्या खेळाडूंची संख्या ११२ एवढी झाली आहे.
वीरेंद्र सेहवाग आणि डायना एडलजी यांच्यापूर्वी ७ भारतीय क्रिकेटपटूंना हा सन्मान मिळाला होता. सर्वप्रथम २००९ मध्ये बिशन सिंह बेदी आणि सुनील गावसकर यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला होता. त्यानंतर २०१० मध्ये कपिल देव यांना हा सन्मान मिळाला होता. पुढे २०१५ मध्ये अनिल कुंबळेचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला होता. तर २०१८ मध्ये राहुल द्रविडलाही हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले. आयसीसीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २०१९ मध्ये हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला. तर विनू मांकड यांना २०२१ मध्ये हॉल ऑफ फेमच्या यादीत स्थान मिळाले होते.
दरम्यान, हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्यानंतर वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी सर्वप्रथम आयसीसी आणि ज्युरींचे आभालर मानतो. त्याबरोबरच मी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, असे माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, सहकारी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी चाहत्यांचेही आभार मानतो.
वीरेंद्र सेहवागने एकूण १०४ कसोटी सामन्यांमध्ये ८५८६ धावा काढल्या होत्या. त्यामध्ये २३ शतकांचा समावेश होता. तर वीरूने कसोटीमध्ये दोन वेळा त्रिशतकेही फटकावली होती. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागने १५ शतके आणि ३८ अर्धशतकांसह ८२८३ धावा काढल्या होत्या. यात एका द्विशतकी खेळीचाही समावेश आहे. त्याशिवाय १९ टी-२० सामन्यांत वीरूने ३९४ धावा काढल्या होत्या.