- रोहित नाईक
मुंबई : ‘आज अनेक खेळांमध्ये आयपीएलच्या धर्तीवर लीग होत आहेत. ही खूप चांगली बाब आहे. यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल झाले असून युवा खेळाडूंसाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुलांनी कोणताही खेळ खेळावा, पण नक्की खेळावे,’ असा मोलाचा संदेश भारताचा स्टार क्रिकेटपटू डोंबिवलीकर अजिंक्य रहाणे याने नवोदित खेळाडूंना दिला आहे.
रविवारपासून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने पहिल्या टी२० मुंबई लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत नॉर्थ मुंबई पँथर्स संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या रहाणेने ‘लोकमत’शी संवाद साधला.
रहाणेने सांगितले की, ‘आज भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेले बदल पाहून खूप आनंद होत आहे. देशात खेळांना महत्त्व आले आहे. अनेक खेळ लीगच्या माध्यमातून प्रगती करत आहेत. प्रत्येकजण क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे इतर खेळातील लीगच्या मध्यमातून युवा खेळाडू आपली चमक दाखवू शकतात. यामुळे भारतात क्रीडा संस्कृती रुजली असल्याचे माझे मत आहे.’
त्याचप्रमाणे, ‘क्रीडा क्षेत्रात आज निर्माण झालेल्या मोठ मोठ्या संधी जाणून नवोदितांनी किंवा लहान मुलांनी घरी बसण्यापेक्षा मैदानात खेळावे. क्रिकेट खेळणार नसाल, तर इतर खेळ खेळावे, परंतु खेळावे जरुर. खेळांच्या माध्यमातून आपल्याला दैनंदिन जीवनातील बरेच गोष्टी शिकण्यास मिळतात,’ असेही रहाणेने यावेळी म्हटले.
मुंबई टी२० लीगच्या निमित्ताने रहाणे घरच्या प्रेक्षकांसमोर मोठ्या कालावधीनंतर खेळणार आहे. याविषयी त्याने म्हटले, ‘मी प्रत्येक सामन्यासाठी उत्सुक असतो. या लीगच्या माध्यमातून ‘एमसीए’ खूप मोठी संधी निर्माण केली आहे. मुंबईच्या मुलांसोबत खेळण्यासाठी मी सज्ज असून उत्सुकताही वाढली आहे. वरिष्ठ खेळाडूंकडून खेळाचा सन्मान करण्याची शिकवण मिळाली आहे आणि त्यानुसार खेळावर लक्ष केंद्रीत करुन मी खेळत असतो. या लीगच्या माध्यमातून भविष्यात मोठ्या स्तरावर मुंबईची गुणवत्ता पाहायला मिळेल.’
टी२० मुंबई लीग युवा खेळाडूंसाठी खूप मोठी संधी आहे. त्यांनी दडपण न घेता खेळले पाहिजे. स्वत:चा नैसर्गिक खेळ करुन प्रत्येकाने आपली छाप पाडावी. प्रत्येकाला आपला सर्वोत्तम खेळ करण्याची उत्सुकता असते. यासाठी त्यांनी कोणत्याही खेळाडूची कॉपी न करता नैसर्गिक खेळावर भर देत खेळावे.
- अजिंक्य रहाणे
Web Title: Do not copy any player - Rahane's advice
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.