मुंबई : महेद्रसिंग धोनी याच्यासारखा खेळाडू एका पिढीत एकदाच घडत असल्यामुळे त्याच्यावर निवृत्तीसाठी दडपण आणण्याऐवजी सावधपणा बाळगा, असा सल्ला इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने शनिवारी दिला. धोनी हा भारतीय क्रिकेटला अद्यापही भरपूर योेगदान देऊ शकतो, असे हुसेनचे मत आहे.
एका क्रीडा वाहिनीच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात नासिर म्हणाला, ‘यष्टिरक्षक फलंदाज धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याने आपला अखेरचा सामना २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यंदा आयपीएलद्वारे धोनीचे मैदानावर पुनरागमन होईल, अशी अपेक्षा होती मात्र कोरोनामुळे त्याला खेळताना पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा आणि उत्सुकता लांबली आहे. कोरोनामुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले असून पुढे होईल याची शक्यता कमीच आहे.
सुनील गावसकर आणि कपिल देव या माजी दिग्गजांनी दीर्घकाळ बाहेर राहिल्यानंतर धोनीचे संघात पुनरागमन कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे. नासिर मात्र दोघांच्याही मताशी सहमत दिसला नाही. तो म्हणाला, ‘धोनी माझ्या मते भारतीय संघाला आणखी चांगले योगदान देऊ शकतो. विश्वचषकात मात्र धोनी अनेकदा चुकल्याने यशस्वी खेळी करू शकला नव्हता, हे सत्य आहे. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यास भारतीय संघ व्यवस्थापन त्याला पुन्हा संघात घेऊ शकणार नाही.’ (वृत्तसंस्था)धोनीसारखा खेळाडू अनेक पिढ्यांनंतर गवसतो, त्यामुळे निवृत्तीवरून त्याच्यावर दडपण आणताना सावध असा. धोनी भारतीय क्रिकेटला अद्याप बरेच योगदान देऊ शकतो. धोनी कशा स्थितीत आहे, हे केवळ त्याला माहीत असल्याने दडपण वाढवणे योग्य नाही. संघात निवड करण्याचा निर्णय निवडकर्त्यांना घ्यायचाअसतो आणि संधी मिळाली की खेळाडू खेळतो. - नासिर हुसेन