नवी दिल्ली : इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर कसोटी मालिका खेळायला पाकिस्तानच्या धरतीवर आला आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून इंग्लिश संघाने विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. खासकरून संघाचा कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानी मीडियानेही बाबर आझमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेवर बाबर आझम मौन बाळगून होता.
मात्र आता त्याने ट्विटच्या माध्यमातून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. "प्रशंसा तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका आणि टीका तुमच्या हृदयात जाऊ देऊ नका", अशा आशयाचे ट्विट करून बाबरने टीकारांना प्रत्युत्तर दिले आहे. एकूणच टीकेला मनावर घेऊ नये असे बाबरने म्हटले आहे. याशिवाय आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचे बाबरने सांगितले आहे.
फलंदाजीत फ्लॉप ठरला बाबरपाकिस्तानच्या पराभवामुळे बाबर आझमला टीकेला सामोरे जावे लागत आहे, याचे कारण म्हणजे त्याची कामगिरी. बाबर आझम दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात धावा करण्यात अपयशी ठरला होता. अशा वेळी बाबरकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो अपयशी ठरला. दुसऱ्या डावात पाकिस्तानला 355 धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्या डावात बाबरने 10 चेंडूत फक्त 1 धाव काढली. आता पाहुण्या इंग्लंडच्या संघाने 2-0 ने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"