दुबई - ‘काही गोष्टी आमच्या विरोधात गेल्या, मात्र त्यावर मला भाष्य करायचे नाही, अन्यथा माझ्यावर कारवाई होईल. मला दंड भरायचा नाही,’असे वक्तव्य करीत कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध मंगळवारी आशिया चषकात भारताचे नेतृत्व करणाऱ्या अनुभवी महेंद्रसिंग धोनी याने पंचांच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली.
अफगाणिस्तानने दिलेल्या २५३ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ एक चेंडू आधीच २५२ धावांत बाद झाल्याने सामना बरोबरीत सुटला. धोनी आणि दिनेश कार्तिक यांना पंचांनी चुकीच्या प्रकारे बाद दिल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच नाराजी व्यक्त केली जात आहे.
सामना संपल्यानंतर धोनीने याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मधल्या फळीत आमचे फलंदाज धावबाद झाले, या चुका टाळता आल्या असत्या. पण अखेरच्या षटकांत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरेख मारा केला. आम्ही पराभूत होऊ शकलो असतो म्हणूनच मी निकालावर आनंदी आहे.’
धोनीने अफगाणिस्तानच्या कामगिरीचे कौतुक केले. कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा सामना होता. फलंदाजीदरम्यान जावेद अहमदीच्या गोलंदाजीवर धोनी पायचीत असल्याचे अपील करण्यात आले होते. पंचांनी हे अपील योग्य ठरविले. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू यष्टींच्या बाहेर जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. दिनेश कार्तिकलाही अशाच प्रकारे पंचांनी बाद ठरवले. यावरून पंचांवर सोशल मीडियामधून चांगलीच टीका करण्यात आली.
‘ही’ बरोबरी विजयासारखीच
भारताविरुद्ध सामना बरोबरीत राखणे विजयासारखेच असल्याचे मत अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगान याने व्यक्त केले. अबुधाबी येथे सामने खेळविल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत असगरने दुबईत सामने झाले असते, तर आमचा संघ फायनल खेळला असता, असाही दावा केला.
सामन्यानंतर असगर म्हणाला, ‘भारतासारख्या संघाविरुद्ध सामना बरोबरीत होणे हा आमचा विजय आहे. भारताने मागच्या दोन्ही सामन्यात सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला होता. आम्ही मात्र त्यांच्यापुढे खडतर आव्हाने उभी केली. अशाप्रकारच्या रोमहर्षक लढती चाहत्यांसाठी देखील चांगल्या असतात.’
अफगाणिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्याआधी बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध देखील अगदी काठावर सामने गमावले. या दोन्ही सामन्यांता त्यांना शेवटच्या षटकामध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्याआधी साखळी लढतीत या संघाने श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत केले होते. आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये वेगवान प्रगती करणारा संघ म्हणून अफगाणची ओळख बनली आहे.
या स्पर्धेतील वादग्रस्त वेळापत्रकाबद्दल अफगान पुढे म्हणाला, ‘दुबईतील परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल आहे. आम्ही येथे बरेच सामने खेळलो. पण आमचे सामने अबुधाबीत ठेवण्यात आले. येथे सामने झाले असते तर अंतिम सामना खेळण्याचा विश्वास होता. आमच्यासोबत अन्याय झाला. या खेळपट्टीवर सामने झाले असते तर आम्ही निश्चितपणे फायनल खेळलो असतो.’ (वृत्तसंस्था)
मी ‘डीआरएस’ घ्यायला नको होता - राहुल
दुबई : ‘मला डीआरएसचा (पंचांची निर्णय समीक्षा प्रणाली) निर्णय घ्यायला नको होता. मी एक संधी घालविली नसती, तर महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांना बाद होण्यापासून वाचविता आले असते,’ या शब्दात लोकेश राहुल याने अफगाणविरुद्ध झालेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला.
राशिद खानच्या गोलंदाजीवर राहुल पायचीत असल्याचे अपील अफगाणी गोलंदाजांनी केले. पंचांनी राहुल बाद असल्याचा निर्णय दिल्यानंतर राहुलने या निर्णयाला डीआरएसद्वारे आव्हान दिले होते. यावेळी राहुल बाद असल्याचे सिद्ध झाल्याने भारताने रिव्ह्यू गमावला. यानंतर धोनी व दिनेश कार्तिक हे पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचे बळी ठरले. यावेळी भारताच्या हातात रिव्ह्यू नसल्याने आव्हान देणे शक्य नव्हते. राहुल म्हणाला, ‘माझी चूक झाली. मी तो रिव्ह्यू घ्यायला नको होता. चेंडू यष्टीच्या बाहेर जाईल असा माझा अंदाज होता, त्यामुळे मला एक संधी घ्यायची होती.’ (वृत्तसंस्था)
यापुढे अफगाणिस्तानला गृहीत लेखण्याची चूक कोणी करणार नाही. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये हा संघ तुल्यबळ आहे. इतका रोमहर्षक अवस्थेत पोहोचलेला सामना खेळून मला फार आनंद होत आहे.
- लोकेश राहुल
मोहम्मद शहजाद विजय हुकल्याने नाराज
अफगाणिस्तानकडून शतकी खेळी करणारा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद शहजाद विजय हुकल्यामुळे नाराज दिसला. तो म्हणाला,‘मी फार निराश आहे. सहा तास मैदानात संघर्ष केल्यानंतरही अनुकूल निकाल मिळालेला नाही. या कामगिरीवर मी नाराज आहे.
आम्हाला दुसºया सकाळी विमान गाठायचे असल्याने बिनधास्तपणे फलंदाजी केली. आशिया चषकात सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध शतक ठोकू शकलो, याचेच अधिक समाधान आहे.’
Web Title: Do not talk about the umpires' decision and do not pay fine - Mahendra Singh Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.