Join us  

शिक्षकाला शिकवू नको! इंझमाम-उल-हकची रोहित शर्मावर टीका अन् नंतर सारवासारव  

रोहित शर्मा आणि इंझमाम-उल-हक यांच्यातील शीतयुद्धात आणखी एक अध्याय जोडला गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 7:00 PM

Open in App

रोहित शर्मा आणि इंझमाम-उल-हक यांच्यातील शीतयुद्धात आणखी एक अध्याय जोडला गेला आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात भारतीय गोलंदाजांवर अप्रत्यक्षपणे बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता.  इंझमामने भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर टीका केली होती. ज्याने १६ व्या षटकात चेंडू रिव्हर्स स्वींग केला आणि त्यावरून इंझमामने आऱोप केला होता. त्यावर जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्माला विचारले असता त्याने दिमाग खोलो जरा.. असा सल्ला दिला. त्यावर आता इंझमामने प्रत्युत्तर दिले, परंतु यावेळी त्याने बॉल टॅम्परिंगचा आरोप करायचा नव्हता अशी सारवासारव केली. 

रोहित शर्माने बॉल टॅम्परिंगचे दावे खोडून काढले आणि रिव्हर्स स्विंगचे श्रेय उष्ण व कोरड्या परिस्थितीला दिले. रिव्हर्स स्विंग केवळ भारतीय गोलंदाजांचाच होत नव्हता, तर सर्व संघांच्या गोलंदाजांचा होत होता आणि यावर रोहितने भर दिला. रोहित म्हणाला, " कधीकधी लोकांना त्यांचे मन उघडून विचार करण्याची आवश्यकता आहे."

रोहितच्या विधानाने पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला मिर्च्या झोंबल्या.  इंझमामने स्पष्ट केले की, मी कधीही भारतावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला नाही. रिव्हर्स स्विंगच्या असामान्य वेळेमुळे चेंडूवर बारीक नजर ठेवण्यासाठी अम्पायर्सना सावध करणे हाच माझा हेतू होता.   

काल अक्षर पटेल ( Axar Patel) आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडला गुडघे टेकायला लावले. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांच्यासह फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १७१ धावा उभ्या केल्या. फिरकीला साथ देणाऱ्या संथ खेळपट्टीवर पटेलने ( ३-२३) इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. त्यानंतर कुलदीप यादवने ( ३-१९) कमाल करताना भारताचा विजय पक्का केला.  इंग्लंडचा डाव १०३ धावांवर गुंडाळला आणि २०२२च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने केलेल्या पराभवाचा भारताने वचपा काढला. टीम इंडिया जेतेपदाच्या लढतीत २९ जूनला दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माऑफ द फिल्ड