मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा आज 48 वा वाढदिवस. कुंबळेने कसोटीत 619 आणि वन डे सामन्यांत 337 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम अजूनही कुंबळेच्या नावावर आहे.
17 ऑक्टोबर 1970 साली जन्मलेल्या कुंबळेने आपल्या प्रभावी फिरकीने जगभरात नाव कमावले. हीरो कपची फायनल असो किंवा पाकिस्तानविरुद्धची दहा विकेट्सची विक्रमी कामगिरी, कुंबळेने अखेरपर्यंत जिंकण्याची जिद्द कायम ठेवली. त्याला सहकारी 'जम्बो' या नावाने बोलवतात. तुम्हाला माहितीय का, त्याला हे नाव कोणी दिले. कुंबळेला जम्बो हे टोपणनाव भारताचा माजी कसोटीपटू नवज्योत सिंग सिद्धूने दिले. पाहा कुंबळेनेच याचे उत्तर दिले... कुंबळेला एका चाहत्याने या टोपणनावाविषयी विचारले होते. त्यावेळी त्याने सांगितले,''जम्बो हे टोपणनाव मला नवज्योत सिंग सिद्धूने दिले. फिरोज शाह कोटला मैदानावर इराणी चषक स्पर्धेत मी शेष भारत संघाकडून खेळत होतो. माझ्या गोलंदाजीच्या वेळेला नवज्योत मिड-ऑनला फिल्डिंग करत होता. त्यावेळी माझ्या एका चेंडूवर त्याने 'जम्बो जेट' अशी प्रतिक्रिया दिली. त्यातील जम्बो हा शब्द तसाच राहिला आणि सर्व सहकारी मला जम्बो असे बोलू लागले.''