मुंबई - इंग्लंड दौऱ्यावर भारतीय फलंदाज सपशेल शरणागती पत्करताना आपण पाहत आहोत. असे काही अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी भल्याभल्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पळता भुई केली आहे. भारताच्या फलंदाजांचा प्रतिस्पर्धींवर आजही पूर्वीसारखाच दरारा आहे. धावांच्या बाबतीत भारतीय फलंदाज आघाडीवर आहेत. त्यामुळेच आकड्यांच्या खेळाची नेहमीच क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असते. शतकांच्या आकड्यांतही भारतीय खेळाडू अग्रेसर आहेत. आत्तापर्यंत भारताच्या 81 फलंदाजांनी एकूण 496 शतकं झळकावली आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का भारतासाठी पहिले कसोटी शतक कोणी झळकावले होते?
महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर सर्वाधिक 51 कसोटी शतकांचा विक्रम आहे. पण, भारताकडून पहिले कसोटी शतक झळकावण्याचा मान लाला अमरनाथ यांना जातो. त्यांनी पदार्पणातच इंग्लंडविरुद्ध 118 धावांची खेळी साकारली होती. लाला अमरनाथ यांची आज 107वी जयंती आहे. 11 ऑगस्ट 1911 साली पंजाबमधील कपूरथला येथे त्यांचा जन्म झाला होता. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखील भारताने पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी मालिका ( 1952-53) जिंकली होती.