नवी दिल्ली : बीसीसीआयने रिटेंशन नियम जाहीर केल्यानंतर दहा संघांना त्यांच्या सध्याच्या संघातील सहा खेळाडूंना कायम राखण्याची परवानगी मिळाली. सहा खेळाडूंसाठी बोर्डाने विशिष्ट रक्कम ठरवून दिली. त्यानुसार पहिल्या व चौथ्या क्रमांकावर रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १८ कोटी द्यावे लागणार आहेत. मुंबईने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार हार्दिक पांड्या हा पहिल्या पसंतीचा खेळाडू असेल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना, हार्दिकला १८ कोटी किंमत मिळावी, एवढी त्याची पात्रता आहे का? असा सवाल हैदराबादचे माजी प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी यांनी केला आहे.
हार्दिकला तुम्ही १८ कोटी देऊन संघात कायम राखणार का, असा सवाल त्यांनी केला. पहिल्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १८ कोटी, दुसऱ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १४ कोटी, तिसऱ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला ११ कोटी, चौथ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १८ कोटी, पाचव्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १४ कोटी, सहाव्या क्रमांकावर अनकॅप्ड खेळाडूसाठी ४ कोटी, अशी नवी नियमावली जाहीर झाली.
मुंबई आयपीएल २०२५ साठी हार्दिक, रोहित, बुमराह, सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. मूडी यांच्या मते, जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव यांना प्रत्येकी १८ कोटी देऊन रिटेन करायला हवे. हार्दिकसाठी १४ कोटी ठीक आहेत. १८ कोटी घेणारा खेळाडू ‘मॅचविनर’ असायला हवा शिवाय तो नियमित खेळणारा हवा. ते पुढे म्हणाले, गेल्या काही महिन्यांत घडलेल्या गोष्टींमुळे रोहित शर्माचा भ्रमनिरास झाला असेल, असे मला वाटते. मी बुमराह व सूर्यकुमारसाठी प्रत्येकी १८ कोटी मोजेन आणि हार्दिकला १४ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये ठेवेन.
Web Title: Does Hardik deserve 18 crores? : Moody
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.