भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीमधील विळ्या-भोपळ्याचं नातं क्रिकेट जगतामध्ये सर्वश्रुत आहे. गौतम गंभीर त्याच्या खोचक बोलण्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. तसेच विराट कोहली हा त्याला अजिबात आवडत नाही, असंही म्हटलं जातं. दरम्यान, अशाच एका कार्यक्रमामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गौतम गंभीरने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होत आहे.
क्रिकेटसंबंधी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात गौतम गंभीरला विराट कोहलीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला विराट कोहली आवडत नाही का? असं विचारल्यावर गौतम गंभीर भडकला. मला तो आवडत नाही हे तुम्हाला कुणी सांगितलं, असा प्रश्न त्याने केला. सोशल मीडियावरची उदाहरणं मी दिली आहेत. मला यावर वारंवार स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे, असे गंभीरने सांगितले.
यावेळी गौतम गंभीरच्या काळात खेळाडूंची आक्रमकता कमी होती, असं विचारण्यात आलं असता तो म्हणाला की, पाहा काळाची तुलना करणं खूप कठीण आहे. याची कधीही तुलना होता कामा नये, असे त्याने सांगितले. गंभीर पुढे म्हणाला की, माझ्या मते आक्रमकता वैयक्तिक असते, ती आतून येते. ती कुणाला शिकवता येत नाही. ती तुमच्या अनुभवामधूनच येते. जर तुम्हाला याची किंमत माहिती असते. तुमचा अनुभव तुम्हाला शिकवतो. अनेक खेळाडूंना ही गोष्ट एवढ्या सहजपणे मिळत नाही. प्रत्येक खेळाडूचा आपाला अनुभव असतो.