नवी दिल्ली : संपूर्ण देश आणि जग सध्या टी-२० विश्वचषक २०२२चा आनंद लुटत आहे. मात्र यादरम्यानच क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी ६ नोव्हेंबर रोजी क्रिकेटमधील दिग्गजाने जगाचा निरोप घेतला. दिग्गज क्रिकेटपटू हैदर अली यांनी वयाच्या ७९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ काळ आजाराशी झुंज दिल्यानंतर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारीच त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मुलांनी ही माहिती दिली.
देशांतर्गत क्रिकेटचे दिग्गज सय्यद हैदर अली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. प्रयागराजमध्ये शनिवारी मरण पावलेल्या हैदर यांच्या पश्चात सय्यद शेर अली आणि रझा अली अशी दोन मुले आहेत. सर्वोत्तम डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या हैदर अली यांना कधीही भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक विक्रमांना गवसणी घातली होती.
BCCIच्या या पुरस्काराने सन्मानित हैदर अली यांची पहिल्यांदा १९६३-६४ मध्ये उत्तर प्रदेश रणजी संघात निवड झाली होती. यानंतर त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व केले. दुलीप ट्रॉफीमध्येही त्यांनी सेंट्रल झोन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १९८७-८८ पर्यंत क्रिकेट खेळले होते. प्रथम श्रेणी सामना खेळून बीसीसीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारे हैदर अली हे एकमेव खेळाडू आहेत. हैदर अली यांनी १९६३-६४च्या हंगामात रेल्वेच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जवळपास २५ वर्षे त्यांनी क्रिकेट खेळले होते. लक्षणीय बाब म्हणजे त्यांनी ११३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३६६ बळी पटकावले होते. ज्यामध्ये त्यांनी ३ वेळा १० बळी तर २५ वेळा पाच बळी पटकावले होते.