भारतीय क्रिकेट इतिहासात रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स नावावर असलेल्या राजिंदर गोएल यांचं अल्पशा आजारानं रविवारी निधन झालं. 77 वर्षीय गोएल यांनी रविवारी कोलकाता येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी त्यांना श्रंद्धांजली वाहिली.
डावखुऱ्या फिरकीपटूनं स्थानिक स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण केला होता. त्यांनी 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित हरयाणा संघासाठी 750 विकेट्स घेतल्या. पण, त्यांना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. हरयाणासह त्यांनी पंजाब व दिल्ली संघांचेही प्रतिनिधित्व केलं. रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 637 विकेट्स घेतल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 2017मध्ये त्यांना सी के नायुडू जीवनगौरव पुरस्कारानं गौरविले होते.
'' राजिंदर गोएल हे दिग्गज खेळाडू होते आणि हरयाणा क्रिकेट असोसिएशचा मजबूत पाया रचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. येथील क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी प्रचंड योगदान दिलं. संघटनेच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो,''असे हरयाणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कुल्टर सिंग मलिक यांनी सांगितले. अहमदाबाद येथे 1964-65 साली सियलॉन संघाविरुद्ध झालेल्या अनौपचारिक कसोटीत त्यांनी टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यांनी दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या होत्या. बिशन सिंग बेदी आणि त्यांच्या गोलंदाजीत साम्य असल्यामुळे गोएल यांना टीम इंडियात संधी मिळाली नाही.
1957 मध्ये त्यांनी उत्तर विभागीय आंतरशालेय स्पर्धेत पश्चिम विभागीय संघाविरुद्ध चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख चढा राहिला. पुढील मोसमात त्यांनी रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. 1974-75मध्ये बंगळुरू येथील कसोटी सामन्यापूर्वी बिशन सिंग बेदी यांना संघातून वगळले आणि त्यावेळी गोएल यांना संधी मिळणार होती, पंरतु अखेरच्या क्षणाला त्यांना वगळण्यात आले. 1979-80मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन्स संघाविरुद्ध 6-102 आणि 3-43 अशी कामगिरी करून दाखवली होती.
सचिन तेंडुलकरनं त्यांना श्रद्धांजली वाहिली.