- रोहित नाईक मुंबई - भारताच्या राष्ट्रीय संघातून खेळण्यास खूप उत्साहीत असून नक्कीच माझ्यावर काही प्रमाणात दबाव आहे. असे असले तरी मी खेळाचा आनंद घेण्याचे लक्ष्य बाळगले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये राखलेले सातत्य भारतीय संघासाठीही कायम ठेवेल,’ असा विश्वास भारताच्या महिला क्रिकेट संघामध्ये निवड झालेल्या १७ वर्षीय मुंबईकर फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हिने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.काही महिन्यांपूर्वी १९ वर्षांखालील राष्ट्रीय महिला स्पर्धेत धमाकेदार द्विशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधलेल्या जेमिमाने यंदाच्या देशांतर्गत स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. स्टार फलंदाज पूनम राऊतने संघात निवड झाल्याचे कळविल्याचे सांगताना जेमिमा म्हणाली, ‘पूनम दीदीने जेव्हा ही बातमी कळवली, तेव्हा माझ्या पालकांना आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतलीच, पण खूप गोष्टींचा त्यागही केला आहे. त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकले.’ वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीची विद्यार्थीनी असलेली जेमिमा पुढे म्हणाली की, ‘यंदा देशांतर्गत स्पर्धेतील सातत्यपूर्ण कामगिरीचा खूप फायदा झाला. १९ वर्षांखालील स्पर्धेत द्विशतक झळकावल्यानंतर खूप कौतुक झाले होते. आत्मविश्वासही वाढला होता. पण मला येथे थांबायचे नव्हते, तर याहून चांगली कामगिरी करायची होती. कारण, जर यानंतर मी अपयशी ठरली असती, तर लोकं मला विसरले असते. त्यामुळे कामगिरीत सातत्य राखण्याचे लक्ष्य बाळगून मी खेळी करत गेले. कामगिरी सातत्य राखण्यात यशस्वी ठरले याचा आनंद आहे.’ भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमबाबत जेमिमा म्हणाली की, ‘वरिष्ठ खेळाडूंसह ड्रेसिंग रुम शेअर करायला मिळणार हा विचारच खूप आनंददायी आहे. त्यांच्याकडे उच्च दर्जाच्या क्रिकेटचा खूप मोठा अनुभव असल्याने खूप सा-या गोष्टी शिकण्यासाठी माझ्याकडे मोठी संधी आहे.’ त्याचप्रमाणे, ‘ मी मिताली राज, हरमनप्रीत कौर यांना कधी भेटले नाही पण त्यांच्याविरुद्ध खेळली आहे. त्यांना आतापर्यंत टीव्हीवर पाहिले होते, पण त्यांचा खेळ जवळून पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो,’ असेही जेमिमा म्हणाली. हरमनप्रीतने चित्र बदलले...हरमनप्रीत जबरदस्त फलंदाज आहे. पूर्वी भारतीय खेळाडू खूप हळू खेळायच्या. परंतु, हरमनने आक्रमक फटकेबाजी करत सर्व चित्र बदलले. तिचा खेळ पाहून आमच्यातही बदल झाले. आपणही षटकार मारु शकतो, असा विश्वास हरमनप्रीतच्या फलंदाजीने दिला, असे जेमिमा म्हणते. मुंबईकर पूनम राऊतविषयी जेमिमाने सांगितले की, ‘पूनम दीदी खूप काळजी घेऊन टीप्स देते. प्रतिस्पर्धी गोलंदाजाची माहिती देऊन तिच्याविरुद्ध कशी फलंदाजी करायची हे ती नेहमी समजवायची. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत वरिष्ठ खेळाडूंविरुद्ध खेळताना अडचणी आल्या नाही. चांगल्या चेंडूवर धाव घेऊन गोलंदाजाची लय बिघडवून खराब चेंडूचा योग्य समाचार घ्यायचा हा पूनमदीदीने दिलेला सल्ला नेहमी लक्षात राहण्यासारखा आहे. तिने केवळ स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचे म्हटले.’ मी मिळालेली संधी नक्की साधणार. परदेशात खेळायला जाणार असल्याने तेथील वातावरणाशी जुळुन घेण्याचे पहिले आव्हान असेल. पण अनुभवी खेळाडूंची साथ असल्याने दडपण नाही. त्यामुळे ही माझ्यासाठी शिकण्याची प्रक्रीया आहे.- जेमिमा रॉड्रिग्स
- Cricket Buzz»
- बातम्या»
- देशांतर्गत स्पर्धेतील सातत्य भारतासाठी कायम राखणार - जेमिमा रॉड्रिग्स
देशांतर्गत स्पर्धेतील सातत्य भारतासाठी कायम राखणार - जेमिमा रॉड्रिग्स
देशांतर्गत क्रिकेटमध्ये राखलेले सातत्य भारतीय संघासाठीही कायम ठेवेल,’ असा विश्वास भारताच्या महिला क्रिकेट संघामध्ये निवड झालेल्या १७ वर्षीय मुंबईकर फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हिने ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 8:15 PM