मुंबई : वेंगसरकर अकादमीच्याच संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात शानदार खेळ केलेल्या अ संघाने ४ गड्यांनी बाजी मारत ब संघाचा पराभव केला. यासह वेंगसरकर अकादमी अ संघाने १३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद उंचावले. विजयी खेळाडूंना या वेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत मुंबईतील १६ नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वेंगसरकर अकादमीच्या दोन्ही ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी अंतिम फेरीत धडक मारत स्पर्धेवर वर्चस्व राखले. प्रत्येकी २१ षटकांच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ‘ब’ संघाला ‘अ’ संघाविरुद्ध मोठी मजल मारता आली नाही. अनिरुद्धने २१ धावांत ३ बळी घेत ब संघाला २१ षटकांत ७ बाद ७५ धावांत रोखण्यात मोलाची कामगिरी केली. ‘ब’ संघाकडून आयुष शिंदे (१८), वेदांत (१४) आणि रामपाल (नाबाद १४) यांनी थोडीफार झुंज दिली. यानंतर माफक लक्ष्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ‘अ’ संघाचीही पडझड झाली. अस्मित (२३) आणि हर्ष (१८) ही सलामी जोडी पाठोपाठ बाद झाल्यानंतर ‘अ’ संघाची घसरगुंडी उडाली. मात्र, रोहनने अखेरपर्यंत नाबाद राहत १२ धावांची मोलाची खेळी करत ‘अ’ संघाच्या विजयावर शिक्का मारला. ‘अ’ संघाने १६ षटकांमध्येच बाजी मारत ६ बाद ७६ धावा काढल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वेंगसरकर संघांचे वर्चस्व
वेंगसरकर संघांचे वर्चस्व
Cricket : वेंगसरकर अकादमीच्याच संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात शानदार खेळ केलेल्या अ संघाने ४ गड्यांनी बाजी मारत ब संघाचा पराभव केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 5:36 AM