१९८३ मधील विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचे माजी फलंदाज सुनिल गावसकर आपल्या कॉमेंट्रीतून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधत असतात. अनेकदा ते कॉमेंट्री करताना खेळाडूंचं कौतुक करतात तर काहीवेळा टीकेचे शॉट्सही लगावतात. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँडच्या सामन्यानंतर दोनच दिवसांत त्यांची एका खेळाडूबद्दलची बदललेली भूमिका आता चर्चेता विषय ठरली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेलच्या धुव्वादार फलंदाजीचा पाऊस पडला. त्याने विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक झळकावलं. त्यामुळे, मॅक्सवेलचं सर्वत्र कौतुक होत आहे. सुनिल गावसकर यांनीही त्यांचं लय भारी कौतुक केलंय. त्यावरुन, आता ते ट्रोल होत आहेत.
मॅक्सवेलने नेदरलँड्सच्या गोलंदाजांना हैराण केले. याला नेमका चेंडू टाकायचा तरी कसा असा प्रश्न त्यांना पडला... बाऊन्सवर अपरकट, पूल... यॉर्करवर स्ट्रेट ड्राईव्ह, बाहेर जाणारा चेंडू विचारूच नका... त्यात मध्येत स्विच हिट... भात्यातील सर्व फटके आज मॅक्सवेलने डच गोलंदाजांसाठी राखून ठेवले होते... त्याने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात वेगवान शतक त्याने झळकावले. या खेळीत त्याने तब्बल ८ नवीन विश्वविक्रमही रचले आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यापूर्वी सुनिल गावसकर यांनी ग्लेन मॅक्सवेलच्या विश्वचषक स्पर्धेतील खेळीवरुन टीका केली होती. विशेषत: पाकिस्तानविरुद्ध खेळताना मॅक्सवेलने लावलेल्या शॉट्सवरुन गावसकर यांनी नाराजी दर्शवली होती. त्यावेळी, ऑस्ट्रेलियाच्या संघात झालेल्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यंदाच्या विश्वचषकात मॅक्सवेल अधिक बेजबाबदार खेळत आहेत. मला वाटतं तो आयपीएलमधील तिसऱ्या नंबरवरच खुश होता. पाकिस्ताविरुद्ध तर पहिल्याच चेंडूवर बाद झाला, असे म्हणत गावसकर यांनी मॅक्सवेलवर टीका केली होती. मात्र, नेदरलँडविरुद्धच्या खेळीनंतर त्यांनी मॅक्सवेलचं लय भारी कौतुक केलंय. गावसकर यांनी काही दिवसांतच आपले शब्द फिरवल्याचं सांगत त्यांना नेटीझन्स ट्रोल करत आहेत.
विशेष म्हणजे सुनिल गावसकर यांनी मॅक्सवेलचं कौतुक करताना, एका षटकाराबद्दल बोलत असताना या शॉ्टससाठी ६ ऐवजी १२ धावा मिळायला हव्या, असे म्हटले. मॅक्सवेलच्या स्वीट हीप आणि रिव्हर्स स्वीपच्या चतुराईचं कौतुक केलं. हा क्रिकेटमधील एक महानतम शॉट आहे, अद्भूत शॉट असून हा छक्का गेलाय. मात्र, ह्या शॉटसाठी १२ धावा मिळायला हव्यात, कारण हा अविश्वसनीय शॉट आहे, असं गावसकर यांनी म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा ३०९ धावांनी विजय
दरम्यान, दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर ग्लेन मॅक्सवेलचे वादळ घोंगावले. त्याने ४४ चेंडूंत १०६ धावा चोपल्या. त्यात ९ चौकार व ८ षटकारासह ८४ धावा केल्या आहेत. मॅक्सवेल आणि डेविड वॉर्नरमुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ३९९ धावांची खेळी केली. तर, ३०९ धावांनी सामना जिंकत विश्वचषकातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजयही मिळवला.