अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर -भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सर्वांत चुरशीची मानली जाते. पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेली चार सामन्यांची मालिका हा लौकिक कायम राखेल, असे दिसते. भारताने २०१२-१३ पासून एकही मालिका गमावलेली नाही. यंदा घरच्या खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करण्याची संधी असेल; पण या मालिकेत हमखास विजय मिळेलच, असे गृहीत धरू नका.
आयपीएलमुळे ऑस्ट्रेलिया संघातील प्रत्येक खेळाडूला भारतीय परिस्थितीचा अनुभव आहे. तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा मिश्रण असलेला संतुलित संघ त्यांनी आणला. भारतात २०१७, २०१८ आणि २०२१ ला मालिका गमाविणारा हा संघ यंदा विजयाच्या निर्धाराने खेळणार असेल.
उभय संघांसाठी केवळ प्रमुख खेळाडू चांगले खेळवून भागणार नाही तर समतोल आणि फॉर्म याला प्राधान्य देत अंतिम एकादश निवडण्यावर दोन्ही संघांचा भर राहणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघ पहिल्यांदा आमने- सामने येणार असल्याने दमदार एकादश निवडणे क्रमप्राप्त ठरेल.
शुभमन लाल चेंडूच्या खेळातही प्रभावी -नागपूर कसोटीत अंतिम एकादश कोणता हे माहीत नसले तरी सात- आठ नावे ठरलेली आहेत. जोरदार चर्चेत असलेला २३ वर्षांचा शुभमन गिल. काही आठवडे आधी कसोटी संघात त्याचे नाव निश्चित नव्हते. एखाद्या जागेसाठी त्याला इतर दावेदारांपेक्षा प्राधान्य द्यावे का, असे मला वाटेल. खरं तर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि अश्विननंतर, नागपूर सामन्यासाठी मी लगेचच त्याचे नाव घेईन.
गिल अलीकडच्या काही महिन्यांत सातत्यपूर्ण फॉर्ममध्ये आहे. खरे आहे, त्याच्या बहुतेक धावा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये येतात; पण त्याच्या फलंदाजीचा दर्जा असाच आहे. तो सर्वोत्तम फलंदाज असून इतर कोणीही सातत्यपूर्ण कामगिरी करू शकले नाहीत. प्रथम श्रेणीतही तो संयमाने खेळल्यामुळे त्याला लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यात अडचण येत नाही.
काहींचे म्हणणे असे की, गिल अजूनही खूप तरुण आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध तो असुरक्षित असू शकतो; पण अशी भीती निराधार आहे. किंबहुना, भारतीय क्रिकेट इतिहासात याउलट उत्कृष्ट उदाहरणे आहेत.
उदा. सुनील गावसकर यांनी १९७१ ला कसोटी पदार्पणातील मालिकेत ७७४ धावा केल्या. तो अद्यापही विक्रम आहे. त्यावेळी गावसकर २१ वर्षांचे होते. सचिनने १६ व्या वर्षी पदार्पण केले व २३ व्या वर्षी तो जगात सर्वोत्तम फलंदाज बनला. विराट कोहलीची १९ वर्षांखालील संघातून झालेली देदीप्यमान वाटचाल अद्याप कायम आहे. तरुण विराट सर्वोच्च स्तरावर विराजमान झाला. गिलने या दिग्गजांच्या पावलांवर पाऊल टाकले. पुढील ५-१० वर्षांत भारतीय फलंदाजीचा मुख्य आधार बनू शकतो. त्याच्याकडे शैली, संयमीपणा, शक्ती आणि धावा काढण्याची प्रचंड भूक आहे. त्याची कारकीर्द बहरण्यासाठी त्याला या वळणावर संघ व्यवस्थापनाच्या विश्वासाची गरज आहे. माझ्या कसोटी एकादशमध्ये गिल असेल. रोहितचा सलामीचा साथीदार म्हणून किंवा रोहित-राहुल जोडी कायम राखायची झाल्यास मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनही!
नागपूर कसोटीत संभाव्य संघ असा असेल : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, लोकेश राहुल, के. एस. भरत/ईशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा/अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.