मोहाली : भारताच्या अंतिम संघात स्थान मिळाले नाही तर कधीही निराश होऊ नका. जो संघ मैदानावर उतरेल त्याला पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा द्या, असा सल्ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये सामनावीर ठरलेल्या मोहम्मद शमीने दिला आहे.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांना संघव्यवस्थापनाकडून प्राधान्य दिले जात असल्यामुळे मोहम्मद शमीला वनडेमध्ये तुलनेने कमी संधी मिळते. याबाबत प्रश्न विचारल्यावर शमीने हे वरील भाष्य केले. तो पुढे म्हणाला, जेव्हा मी नियमितपणे अंतिम संघात खेळत होतो. तेव्हा कुणालातरी संघाबाहेर बसावे लागते होते; पण त्यासाठी मला दोष दिला जात नव्हता. त्यामुळे ही वेळ जर आता माझ्यावर आली तर मी तरी कुणाला का जबाबदार धरू. संघात स्थान मिळो अथवा न मिळो, मी सदैव सकारात्मक विचार करत असतो. सध्या भारतीय संघ विजयी मार्गावर आहे, त्यातच मला समाधान आहे.
गेल्या काही सामन्यांपासून भारतीय संघव्यवस्थापनाने संकेत दिले आहेत की, संघात दोनच वेगवान गोलंदाजांना खेळविण्याची गरज पडली तर आधी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना आधी प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर मोहम्मद शमीचा विचार करण्यात येईल. याची कल्पना खुद्द मोहम्मद शमीलादेखील आहे. मात्र, त्याला यावर कुठलीच आपत्ती नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शमीने ५१ धावांत कांगारूंचा अर्धा संघ तंबूत परतवला होता. तरीसुद्धा पुढच्या सामन्यात त्याला अंतिम संघात स्थान मिळेल, याची शाश्वती नाही. याबाबत बोलताना तो म्हणाला, क्रिकेट सामन्यांचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे. अशावेळी संघात रोटेशन पद्धत सदैव सुरू असते. त्यात काहीही वाईट नाही. या पद्धतीनुसार मी आज संघाबाहेर असलो तरी भविष्यात पुन्हा संघात स्थान मिळण्याचा विश्वास असतो.
विश्रांती घेतल्याने फायदा झाला
जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर शमीला काही काळ विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे तो वेस्ट इंडीज दौऱ्याला मुकला होता. याबाबत बोलताना शमी म्हणाला, जवळपास सात ते आठ महिन्यांपासून मी सलग क्रिकेट खेळत होतो. त्यामुळे माझ्यासाठी विश्रांती गरजेची होती. दरम्यान, घरी असताना मी स्वस्थ बसलो नाही. तिथेसुद्धा मी गोलंदाजीचा सराव करणे सुरूच ठेवले. त्याचा सकारात्मक परिणाम सध्या माझ्या गोलंदाजीवर झाला आहे.
संघाच्या रणनीतीचा हा भाग
ठरावीक खेळाडूंना आधी खेळविणे, हा संघाच्या रणनीतीचाच एक भाग असतो. यात काहीही चुकीचे नाही. कारण, खेळाडूंना डोळ्यासमोर ठेवूनच तुम्हाला प्रत्येक सामन्यात रणनीतीची आखणी करावी लागते. अशावेळी अंतिम अकरा खेळाडू ठरलेले असतील तर संघव्यवस्थापनाला डावपेच आखताना कमी त्रास जातो.
Web Title: Don't be disappointed if you don't make it to the final team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.