Join us  

संग्रहालयातील प्राण्यांसारखी वागणूक नको, नियमांचे पालन करू!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काही भारतीय खेळाडूंनीदेखील बराच त्याग केला आहे. सप्टेंबरमध्ये आयपीएल सुरू होण्याआधीपासूनच हे खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियात त्याहून कठोर नियमाचा सामना करावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 5:27 AM

Open in App

सिडनी : ‘एकीकडे चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देता, दुसरीकडे आम्हाला विलगीकरणाची सक्ती करता.’ सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आम्हीदेखील कोरोना नियमांचे पालन करू, पण संग्रहालयातील प्राण्यांसारखी आम्हाला वागणूक देऊ नका, या शब्दात टीम इंडियाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे नाराजी व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंसोबत होत असलेल्या वाईट वागणुकीबद्दल बीसीसीआयने ही नाराजी बोलून दाखविली असून, तिसऱ्या कसोटीआधी सोमवारी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तरीदेखील कोरोना प्रोटोकॉलनुसार खेळाडूंना सिडनीतील हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवले जाऊ शकते, असे संकेत मिळाले आहेत. यामुळे खेळाडू भडकले. आमच्यासोबत प्राण्यांसारखी वागूणक का करता, असा खेळाडूंचा सवाल आहे.

खेळाडूंचे म्हणणे असे की, सिडनीत जे नियम असतील त्याचे सर्वसामान्य नागरिकासारखे आम्ही पालन करू. प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकासारखे आम्हीदेखील नियमांना बांधील आहोत. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देणार नसाल तर आमच्या विलगीकरणात राहण्याला अर्थ आहे.’

भारतीय खेळाडूंंनी केला त्यागऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी काही भारतीय खेळाडूंनीदेखील बराच त्याग केला आहे. सप्टेंबरमध्ये आयपीएल सुरू होण्याआधीपासूनच हे खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियात त्याहून कठोर नियमाचा सामना करावा लागत आहे. मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाल्यानंतरही तो घरी जाऊ शकला नव्हता. वडिलांचे अंत्यदर्शनही त्याला घेता आले नाही. सलग सहा महिन्यापासून खेळाडू बायोबबलमध्ये वास्तव्यास असणे सोपे काम नाही, असे भारतीय संघ व्यवस्थापनाचे मत आहे.

सिडनी, ब्रिस्बेनमध्ये खोलीबाहेर पडण्यास मनाईभारतीय संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडनी आणि ब्रिस्बेन येथे हॉटेलच्या खोलीबाहेर पडण्यास खेळाडूंना मनाई असेल, असे सीएच्या वैद्यकीय पथकाने मागच्या आठवड्यात ताकीद दिली होती. भारतीय खेळाडूंनी त्यांचे हे निर्देश मानलेदेखील. तथापि, संघ व्यवस्थापनाने लगेचच हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगून टाकले होते.

क्वीन्सलॅन्ड सरकारने फटकारलेक्रिकबजच्या वृत्तानुसार, क्वीन्सलॅन्ड सरकारने भारतीय संघाला सरावाव्यतिरिक्त बाहेर जाण्यास बंदी घातली होती. नियमांचे पालन करायचे नसेल तर भारतीय संघाने क्वीन्सलॅन्ड येथे चौथा कसोटी सामना खेळण्यास येऊ नये, असेही बजावले होते. रोहितसह ज्या पाच खेळाडूंवर नियमभंगाचा आरोप ठेवण्यात आला, त्याचा तपास सुरू आहे. आज त्यांनी विशेष विमानाने अन्य खेळाडूंसोबत मेलबोर्न ते सिडनी असा प्रवास केला खरा, मात्र चाचणीत निगेटिव्ह आल्यानंतरही अन्य खेळाडूंपासून त्यांना दूर बसण्यास सांगण्यात आले. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया