नवी दिल्ली : ‘२३ वर्षीय युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्यात मोठी क्षमता असून, त्याने कमी वेळेत चांगली प्रगती केली. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याने अनेकांना प्रभावितही केले. मात्र, त्याची तुलना दिग्गज वसीम अक्रमशी केल्यास अर्शदीपवर दडपण वाढू शकते,’ असा इशारा दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार खेळाडू जाँटी ऱ्होड्सने दिला.
एका कार्यक्रमात अर्शदीपबाबत ऱ्होड्स म्हणाला, ‘स्विंगचा बादशाह वसीमशी अर्शदीपची तुलना केल्यास त्याच्यावर दडपण वाढेल. पॉवर प्ले व डेथ ओव्हरमध्ये त्याचा मारा शानदार ठरतो. चेंडूवर त्याची चांगली पकड असल्याने अक्रमप्रमाणे ‘अराऊंड द विकेट’ तो प्रभावी ठरु शकतो.’आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असताना ऱ्होड्सने अर्शदीपसोबत काम केले. ऱ्होड्स म्हणाला, ‘अर्शदीपमध्ये मोठी क्षमता आहे. सलग दोन टी-२० विश्वचषकात निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय युवांना झुकते माप मिळू शकेल.’
विदेशी क्रिकेटपटूंना आयपीएलचा फायदा बीसीसीआयने कोणत्या खेळाडूंवर अधिक भर द्यायला हवा, यावर ऱ्होड्स म्हणाला, ‘न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या संघात अनेक युवा चेहरे आहेत. याशिवाय काही शानदार खेळाडू प्रतीक्षेत आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंना आयपीएल खेळण्याचा फायदा झाला.’ ऱ्होड्सने ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये टी-१० हा प्रकार खेळवायला हवा, असेही मत मांडले.