नवी दिल्लीअजिंक्य रहाणेची स्वत:ची अशी फलंदाजीची शैली आहे आणि त्यानं विराट कोहलीला कॉपी करणं चुकीचं ठरेल, असं विधान भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं केलं आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात पहिली कसोटी खेळल्यानंतर कोहली मायदेशी परतणार आहे. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर असल्याने तो सुटी घेणार आहे. या काळात उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे दिली जाण्याची शक्यता आहे.
विराटच्या अनुपस्थितीत शांत स्वभावाच्या अजिंक्यच्या नेतृत्त्वामध्ये आक्रमकपणा दिसेल का? असा सवाल उपस्थित केला जात होता. 'अजिंक्य शांत आणि संयमी खेळाडू आहे. विराटपेक्षा तो अतिशय वेगळा खेळाडू आहे. त्यामुळे अजिंक्यने विराटसारखं आक्रमक होणं चुकीचं ठरेल. त्यानं आपल्या खेळात किंवा स्वभावात कोणताही बदल करू नये', असं मत हरभजनने व्यक्त केलं आहे.
कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने २०१८ साली ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ असा विजय प्राप्त करुन पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत केलं होतं.
विराटची अनुपस्थिती जाणवेल'विराटची ऑस्ट्रेलियातील कामगिरी वाखाणण्याजोगी राहीली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यांमध्ये नक्कीच विराटची अनुपस्थिती जाणवेल. याशिवाय, संघाला आक्रमकपणे पुढे घेऊन जाण्याची हातोटी त्याच्याजवळ आहे त्याचीही उणीव भासेल', असं हरभजन म्हणाला.