हॅमिल्टन : केवळ दोन-चार सामन्यांतील अपयशावरून जसप्रीत बुमराहच्या क्षमतेवर शंका घेणे चुकीचे असल्याचे मत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने शनिवारी व्यक्त केले. बुमराह अनेक वन डे सामन्यात ‘मॅचविनर’ होता, हे चाहत्यांनी आणि टीकाकारांनी विसरू नये, असेही शमी म्हणाला. बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध संपलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकही गडी बाद करता आला नाही. तेव्हापासून त्याच्या गोलंदाजी क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शमी म्हणाला, ‘माझ्या मते, बुमराहला दोन- चार सामन्यात बळी मिळाले नसतील तरी त्याच्या अपयशाविषयी चर्चा सुरू होऊ नये. काहीवेळ प्रतीक्षा करायला हवी. त्याच्या सामना जिंकण्याच्या क्षमतेकडे डोळेझाक व्हायला नको.’बुमराहचा ज्येष्ठ सहकारी असलेल्या शमीने आज सराव सामन्यात तीन गडी बाद केले. बुमराहने भारतीय संघासाठी अनेकदा देदीप्यमान कामगिरी केली आहे. तो मॅचविनर आहे. त्याच्याबाबत सकारात्मक विचार केल्यास त्याचाही आत्मविश्वास उंचावेल, या शब्दात शमीने बुमराहच्या टीकाकारांना समज दिली आहे.बाहेर बसून कुणावर टीकाटिप्पणी करणे सोपे आहे. मैदानात खेळाडूसाठी किती कठीण परिस्थिती असते हे केवळ तो खेळाडू समजू शकतो.