इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात विराट कोहली व रोहित शर्मा ( Virat Kohli and Rohit Sharma) यांची कामगिरी निराशाजनक झालेली पाहायला मिळतेय. भारताच्या या दोन्ही खेळाडूंमध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि ते लवकरच त्यांच्या फॉर्मात परततील, असा अनेकांना विश्वास आहे. भारताचा माजी कर्णधार व BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याचेही तेच मत आहे. विराट व रोहित लवकरच फॉर्मात येतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
तो म्हणाला,''ही दोघंही दिग्गज खेळाडू आहेत आणि ते फॉर्मात परततील, याची मला खात्री आहे. ते लवकरच धावा करायला लागतील, अशी मला आशा आहे. विराट कोहलीच्या डोक्यात काय चाललंय, याची मला कल्पना नाही, परंतु तो फॉर्मात येईल आणि जुन्या अंदाजात दिसेल. तो ग्रेट प्लेअर आहे.''
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ( RCB) माजी कर्णधाराला आयपीएल २०२२त ९ सामन्यांत १२८ धावा करता आल्या आहेत, तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने ८ सामन्यांत १९.१३च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२२त नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स या संघांच्या कामगिरीवर गांगुली थक्क झाला आहे. तो म्हणाला,''हे खूप मजेशीर आहे. मी आयपीएल पाहतो आणि कोणताही संघ जिंकू शकतो, कारण सर्वच चांगले खेळत आहेत. गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स यांची कामगिरी चांगली झाली आहे.''
गुजरात टायटन्स १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत, तर लखनौ सुपर जायंट्सही १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत.