- रोहित नाईक
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लहानपणी प्रत्येक खेळाडू मैदानावर घाम गाळतो. दिवसभर वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळले जातात. परंतु, खेळाडू जेव्हा यशस्वी होतात, तेव्हा ते सर्व सोयीसुविधा असलेल्या मोठ्या मैदानांवर खेळण्यास प्राधान्य देतात. असे करू नका. मैदान क्रिकेटद्वारेच तुम्ही स्वत:चा खेळ भक्कम करू शकता, असा सल्ला भारताचा स्टार क्रिकेटपटू सरफराझ खान याने नवोदित खेळाडूंना दिला.
सरफराझच्या हस्ते शनिवारी मुंबईतील प्रतिष्ठित १६ वर्षांखालील कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत सरफराझने २०१२ साली सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळवला होता. यानिमित्ताने सरफराझने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्याने म्हटले की, ‘ज्या स्पर्धेत मी एकेकाळी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता, तिथे आज प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिलो, याचा आनंद आहे. अशा स्पर्धेतूनच मुंबईचे कसोटीपटू घडतात. कारण, लहान वयातच मुंबईकरांना दोन-तीन दिवसीय सामने खेळण्याचा अनुभव मिळतो.’
नवोदितांना सल्ला देताना सरफराझ म्हणाला की, ‘मैदान क्रिकेट खूप मोलाचे आहे. इथेच अधिक खडतर आणि आव्हानात्मक खेळपट्ट्या मिळतात. पालक व प्रशिक्षकांचा सन्मान करा आणि क्रिकेटचाच विचार करा, नक्की यशस्वी व्हाल.’
भारतीय संघ आता थेट नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी क्रिकेट खेळणार आहे. यादरम्यान तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेणार असल्याचे सरफराझने सांगितले. तो म्हणाला की, ‘सध्या मोठा ब्रेक असल्याने मी माझा नियमित सराव करतोय आणि तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेतोय. फलंदाजी सुधारण्यावरही भर देतोय. तसेच कौंटी क्रिकेट खेळण्याचा सध्या विचार नाही. पण, संधी मिळाल्यास तिथे जाऊही शकतो.’
‘मुशीरच्या कामगिरीचा आनंद’
सरफराझने आपला लहान भाऊ मुशीर खानच्या कामगिरीचा आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, ‘मुशीर खूप मेहनत घेतोय. रणजी स्पर्धेतील त्याच्या योगदानाचा आनंद आहे. मुंबईला ४२वे जेतेपद पटकावून देण्यात त्याने मोलाची भूमिका निभावली. भविष्यात तोही नक्कीच भारताकडून खेळेल.’
Web Title: Don't overlook the small cricket grounds; Sarfaraz Khan gives advice to budding cricketers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.