अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
भारताच्या टी-२० विश्वचषकातील ‘फ्लॉप शो’वर चर्चा आणि वादविवाद अद्याप कायम आहे. माझ्या मते, हा विषय आता बंद व्हावा; पण पराभवातून धडा घेण्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही. जुन्या जखमा वारंवार उकरून काढल्याने काहीही सिद्ध होत नाही. केवळ वेदना होतात. आता पुढे जाण्याची वेळ आहे. बांगलादेश दौऱ्यानिमित्त भारतीय क्रिकेटला नव्याने सज्ज होण्याची संधी असेल. या दौऱ्याची फारशी चर्चा झाली नसली, तरी दौऱ्याचे महत्त्व कमी होत नाही. रविवारपासून सुरू होत असलेली तीन सामन्यांची वन डे मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील निकाल व अनुभवाचा पुढे परिणाम जाणवणार आहे. उदा. वन डे विश्वचषकाचे आयोजन दहा महिन्यांनंतर होईल. यजमान संघाला यात थेट प्रवेश असतो. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या निकालाचा स्पर्धेतील सहभागावर भारताला त्रास जाणवेल, असे मुळीच नाही.
भारत डब्ल्यूटीसी फायनल खेळेल?पुढील वर्षीच्या विश्वचषकामुळे मी वन डे क्रिकेटवर अधिक भाष्य केले. मात्र, दोन कसोटी सामनेही तितकेच महत्त्वाचे आहेत. जुलै २०२३ मध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिपची (डब्ल्यूटीसी) फायनल होईल. २०२१ ला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झालेला भारत पुन्हा फायनल खेळेल? स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सुरुवात तर चांगली झाली होती; मात्र दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत पराभवाची निराशा पदरी पडली.
ऑस्ट्रेलिया जवळपास अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्याच्याविरुद्ध खेळणारा संघ कोणता असेल याविषयी गूढ वाढतच चालले. गुणांकन आणि शक्यता यावरून इंग्लंड, पाकिस्तान आणि भारत या संघांनी मार्चपर्यंत दमदार कामगिरी केल्यास एकाला संधी राहील. त्यादृष्टीने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिकाही अत्यंत महत्त्वाची ठरेल. हा दौरा सोपा नाहीच. वैयक्तिक आणि सांघिकदृष्ट्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्या पुनरुज्जीवनासाठीदेखील दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
कचखाऊपणा, प्रयोगशीलता टाळावीभारताची चिंता ही सहभागापुरती मर्यादित नसून, विश्वचषक जिंकणे ही असेल. त्यासाठी सर्व संघांचे आव्हान पेलू शकेल, असा बलाढ्य संघ उभा करण्याचे आव्हान आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकाने कचखाऊपणा आणि प्रयोगशीलतेमुळे होणारे नुकसान अधोरेखित केले. असे वारंवार घडू नये. बांगलादेशविरुद्ध कामगिरी आणि निकालाला महत्त्व असेल. त्यातही अडथळे आहेत. बुमराह सावरला नसताना शमी बाहेर झाला. दोन्ही अनुभवी आणि दर्जेदार वेगवान गोलंदाज संघात नाहीत.
सूर्या, चहलला का वगळले?
संघ निवडीतही गोंधळ दिसतो. फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार संघात नाही. ‘वर्कलोड व्यवस्थापनाचे’ कारण पुढे केले जाऊ शकते. पण, माझा अद्यापही विश्वास आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, मग तो कितीही नवखा असो, त्याला विश्रांतीऐवजी संधी द्यायलाच हवी. ‘फॉर्म’ हा शाश्वत नसतोच; म्हणूनच खेळाडू जेव्हा चांगला खेळत असेल तेव्हा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी त्याला मैदानावर पाठवायला हवे.
गोलंदाजांत युझवेंद्र चहलची अनुपस्थिती हा धक्का आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याची ओळख ‘मॅचविनर फिरकीपटू’ अशी होती. टी-२० विश्वचषकात त्याला संधी नाकारण्यात आली आणि आता तो चक्क बाहेर झाला. रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक या तरुणांच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. तथापि, रोहित शर्मा, राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासारखे आघाडीचे खेळाडू कसे खेळतात हे अधिक महत्त्वपूर्ण असेल. विश्वचषकाच्या खराब कामगिरीत रोहित, राहुलचा फॉर्म प्रमुख राहिला. ऋषभ पंतमध्ये विश्वचषकाच्या मोजक्या सामन्यांत आणि न्यूझीलंडमध्ये खेळताना आत्मविश्वासाची उणीव जाणवली.