आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १० वर्ष निवृत्त झाल्यानंतर माजी कर्णधार राहुल द्रविड ( Rahul Dravid) आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून दाखल होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाचा मार्गदर्शन करणार आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर आता मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी द्रविडकडे असणार आहे, अशी घोषणा बुधवारी बीसीसीआयनं केली. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ठ असलेला द्रविड आता टीम इंडियासोबत असणार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया आयसीसच्या तीन महत्त्वाच्या ( वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा) स्पर्धा खेळणार आहेत. राहुलनं आयपीएलच्या दोन फ्रँचायझींसह, भारत अ व १९ वर्षांखालील संघालाही मार्गदर्शन केलं आहे.
८ वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव गाठीशी असलेला द्रविड आता टीम इंडियाचा २०१३नंतरचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवतो का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. राहुल द्रविडच्या या निवडीवर भारताचा माजी कर्णधार अजय जडेजा ( Ajay Jadeja) यानं त्याचं मत व्यक्त केलं आणि त्यानं बीसीसीआयला खास विनंती केली आहे. Cricbuzzशी बोलताना जडेजानं बीसीसीआयला विनंती केली की, संघाला कसं मार्गदर्शन करायचे हे तुम्ही त्याला शिकवू नका आणि त्याला त्याच्या दूरदृष्टीनं त्याचं काम करू द्या.
''शिस्त आणि समर्पण याचा आदर्श म्हणजे राहुल द्रविड. तुम्हाला प्रशिक्षकांकडून बऱ्याच अपेक्षा असतात, परंतु शिस्त व समर्पण याही दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार कोण निवडतो, राहुल द्रविड की निवड समिती हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. द्रविडनं मिळवलेल्या यशाबद्दल तिळमात्र शंका नाही, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर बसते, तेव्हा तुम्ही त्याला त्याचं काम करू न दिल्यास किंवा त्याच्या दूरदृष्टीचा वापर न केल्यास, सारं काही व्यर्थ ठरेल. मग असा तर कोणीही प्रशिक्षक बनेल,''असे जडेजा म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''राहुल द्रविडसारखं मोठं नाव जेव्हा तुम्ही प्रशिक्षक म्हणून निवडता, तेव्हा किमान त्याला त्याच्या दृष्टीकोनानं काम करू द्या. त्यामुळे मी बीसीसीआयला एक विनंती करतो की, राहुल द्रविड या पदावर असेल, तर त्याच्या दूरदृष्टीला वाव द्या. संघाला कसं मार्गदर्शन करायचं हे, त्याला सांगू नका.''