विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं सोमवारी पराभवानंतरही Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफमध्ये तिसरे स्थान पक्के केले. दिल्ली कॅपिटल्सनं त्यांना ६ विकेट राखून पराभूत करताना क्वालिफायर १मध्ये जागा पटकावली. RCBनं नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) पेक्षा त्यांचा नेट रन रेट चांगला होता. आता मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीवर KKRचं भवितव्य अवलंबून आहे.
आज SRHनं विजय मिळवला, तर ते प्ले ऑफचं चौथं स्थान पक्क करतील. त्यांचा नेट रन रेट हा +०.५५५ असा आहे, तर KKRचा नेट रन रेट -०.२१४ असा आहे. RCBला एलिमिनेटर ( ६ नोव्हेंबर) सामन्यात SRH किंवा KKRचा सामना करावा लागू शकतो. पण, इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन यानं RCB यंदाचे जेतेपद जिंकण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. इथून पुढे सलग तीन सामने जिंकण्याची क्षमता RCBकडे नाही, असे वॉनला वाटते. त्यामुळे IPL जतेपदासाठी त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल.
RCBला आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सत्रात RCBकडून चांगला खेळ झाला, पण त्यानंतर त्यांना सलग चार पराभव पत्करावे लागले. त्यांना १६ गुणांसह प्ले ऑफमधील स्थान पक्कं करण्यासाठी केवळ एक विजय हवा होता आणि तोही ते मिळवू शकले नाही. नेट रन रेटच्या जोरावर त्यांनी प्ले ऑफचं तिकिट मिळवलं. ''RCB यावेळी जेतेपद पटकावतील? मी सुरुवातीपासून सांगतोय की यंदा जेतेपद पटाकवण्यासाठी त्यांच्याकडून हवा तसा सांघिक खेळ झालेला दिसला नाही. २०२०मध्ये काहीही शक्य होऊ शकतं, त्यामुळे काय घडेल, हे कुणीच सांगू शकत नाही. विराट कोहली कदाचित डावखुरी फलंदाजी करेल आणि सामना जिंकेल, परंतु हा खूप लांबचा पल्ला आहे,''असे वॉन म्हणाला.
तणावजन्य स्थितीत चांगली कामगिरी करून संघाला सलग तीन सामने जिंकून देऊ शकतील अशा अनुभवी खेळाडूंची RCBच्या संघात कमतरता आहे, असे वॉनला वाटते. तो म्हणाला,''या संघाकडे पाहा आणि त्यातील खेळाडूंकडेही. तणावात दमदार खेळ करून संघाला विजय मिळवून देतील, असे खेळाडू कमी आहेत. त्यांच्याकडे आता एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आक्रमक क्रिकेट खेळणे.''