- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर)
इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धाडसी वक्तव्य केले असले तरी कसोटी क्रिकेटमधील प्रतिष्ठेचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघाला शानदार कामगिरी करावी लागणार आहे. सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल आणि त्यानंतर यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये भारतापुढे खडतर आव्हान राहणार आहे. इंग्लंडमध्ये कसोटीत भारतीय संघाची कामगिरी विशेष चांगली ठरलेली नाही.
सर्वप्रथम डब्ल्यूटीसी फायनलचा विचार करू. पात्रता लढतींमध्ये भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल होता आणि दुसऱ्या स्थानावरील न्यूझीलंड संघ नशीबवान ठरला. त्यामुळे कोहली व शास्त्री यांनी किवी संघाला कमी लेखले तर ते चुकीचे ठरेल. गेल्या काही वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारतीय संघाने कामगिरीत सातत्य राखले आहे. किवी संघाच्या कामगिरीतही कमालीची सुधारणा दिसून येते.
सध्या आययीसी मानांकनामध्ये भारतीय संघ कसोटीत अव्वल स्थानी, वन-डेमध्ये तिसऱ्या तर टी-२० मध्ये दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंड संघ कसोटीत दुसऱ्या, वन-डेमध्ये अव्वल तर टी-२० मध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये विशेष फरक नाही.
याव्यतिरिक्त डेवोन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्समध्ये पदार्पणाच्या कसोटीत द्विशतकी खेळी करीत भारतीय संघाच्या चिंतेत भर घातली आहे. अष्टपैलू खेळाडूंपाठोपाठ इंग्लंडमधील अनुकूल वातावरणात भेदक वेगवान मारा करण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजांच्या समावेशामुळे न्यूझीलंड संघ बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे. त्यानंतर यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. सहा आठवड्यांच्या या मालिकेत भारतीय संघापुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान राहील. भारताने अलीकडेच मायदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेत इंग्लंडचा ३-१ ने पराभव केला होता; पण इंग्लंडबाहेर खेळणे आणि इंग्लंडमध्ये खेळणे यात बरेच अंतर आहे.
गेल्या तीन मालिकेत भारतीय संघाला येथे ०-४ (२०११), १-३ (२०१४ ) आणि १-४ (२०१८ ) पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यात २०११ व २०१८ मध्ये भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता; पण तरी इंग्लंडमधील कामगिरीत फरक पडला नाही. दरम्यान, यापूर्वी भारतीय संघाने २००७ मध्ये येथे द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकली होती.
Web Title: Don't underestimate Shastri-Kohli's reputation, don't underestimate New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.