पाकिस्तान क्रिकेट संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आणि त्यामुळे बाबर आजम अँड टीमवर चहुबाजूंनी टीका होताना दिसत आहे. त्यात पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन ( Gary Kirsten) यांच्या कथित विधानाने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार कोच कर्स्टन यांनी पाकिस्तानी संघातील वाद जगासमोर आणले आणि खेळाडूंचे वाभाडे काढले. कर्स्टन यांच्या त्या विधानानंतर भारताच्या माजी क्रिकेटपटूने तिथे वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही, भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यासाठी या, असा सल्ला देऊन एका दगडात दोन पक्षी मारले...
पाकिस्तानच्या वर्ल्ड कप एक्झिटनंतर कर्स्टन यांनी धक्कादायक विधान केले आहे आणि त्यांनी संघातील दुफळी उघड्यावर आणली आहे. कर्स्टन यांनी असे विधान केल्याचे दावे पाकिस्तानी मीडियाने केले आहेत. त्यांनी दिलेल्या वृत्तांनुसार, संघाने एकात्मतेवर, फिटनेसवर आणि आपले कौशल्य सुधारणेवर भर द्यायला हवा, असे स्पष्ट मत कर्स्टन यांनी मांडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कर्स्टन यांनी खेळाडूंशी सहज गप्पा मारल्या आणि त्यांनी तुमची फिटनेस चांगली नसल्याची खेळाडूंना सांगितले. हा संघ म्हणून एकसंध नाही असेही त्यांनी म्हटले.
कर्स्टन यांचे विधान व्हायरल झाल्यानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) याने गॅरीला सल्ला दिला आहे. त्याने ट्विट केले की, गॅरी तिथे वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये... गॅरी कर्स्टन एक दुर्मिळ हिरा आहे. २०११ च्या आपल्या संघातील ते एक सर्वोत्तम प्रशिक्षक, मार्गदर्शक, मित्र आहेत. आपला २०११चा वर्ल्ड कप विजेता प्रशिक्षक... खास व्यक्ती गॅरी...
हरभजन याने गॅरी यांना पुन्हा टीम इंडियाला प्रशिक्षण देण्याची विनंती केल्याने त्याचा
गौतम गंभीरच्या नावाला विरोध आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपतोय आणि
गौतम गंभीरचे नाव नवीन प्रशिक्षक म्हणून जवळपास निश्चित झाले आहे.
Web Title: Don’t waste ur time there Gary .. Come back to Coach Team INDIA; Harbhajan Singh requested to Pakistan coach Gary Kirsten
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.