नवी दिल्ली : वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संंघ आता वन डे मालिकेत व्यस्त आहे. ही मालिका आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेल. यानिमित्ताने संंघ संयोजनाचा वेध घेता येईल. हार्दिक पांड्याची भूमिका कशी असेल आणि तो किती प्रभावी मारा करेल, याबाबत आकाश चोप्रा, साबा करीम आणि अभिनव मुकुंद या माजी दिग्गजांनी मत मांडले.
अभिनवच्या मते, हार्दिक स्वत:च्या कोट्यातील दहा षटके टाकू शकणार नाही. त्याने पाच किंवा सहा षटके यशस्वीपणे टाकली तरी संघाच्या दृष्टीने मोलाचे ठरेल. जडेजा आणि हार्दिक सोबत खेळणार असतील, तर दोघांकडे अष्टपैलू म्हणून पाहावे लागेल. हार्दिक सुरुवातीची दहा षटके गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे, असा विचार बाळगणे योग्य होणार नाही. आकाश चोप्रादेखील अभिनवच्या मताशी सहमत दिसला. तो म्हणाला, ‘मी त्याला या प्रकारात पाच किंवा सहा षटके गोलंदाजी करताना पाहात आहे. सलग दहा षटके मारा करणे हार्दिकसाठी शक्य नाही. या तीन सामन्यांत तो किती षटके टाकू शकतो आणि कर्णधार त्याच्याकडून कसा मारा करवून घेतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
साबा करीमनेदेखील मत मांडले. तो म्हणाला, ‘हार्दिकने पाच-सहा षटके गोलंदाजी केली तर संघाला हितावह ठरणार आहे. हार्दिक असेल तर संघात संतुलन साधले जाईल. तो फलंदाजी करू शकतो, शिवाय पाच-सहा षटके गोलंदाजी करू शकल्यास संघाच्या यशात त्याचे योगदान महत्त्वपूर्ण ठरू शकेल. हार्दिक सध्या पूर्ण तंदुरुस्त असून विंडीजविरुद्ध मैदानात उतरेल. आयपीएल-१६ मध्ये त्याने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही योगदान दिले होते. वन डे विश्वचषकात हार्दिक टीम इंडियाचा मोलाचा खेळाडू ठरणार आहे.