चेन्नई, दि. 18 : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी आज भारतीय संघ कोलकाताला रवाना झाला. पण वेळेआधीच संघ चेन्नई विमानतळावर आला. तेव्हा खेळाडू विमानाची प्रतीक्षा करावी लागली. संघातील खेळाडूंनी खालीच बैठक मारली. परंतु कूल धोनी हा मस्त फ्लोवरवर झोपून आराम करत असल्याचे पहायला मिळाले. भारतीय संघाचा हा फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. पण कायमच काहीतरी हटके करण्यासाठी ऑन आणि ऑफ फिल्ड लोकप्रिय असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने याबाबतीही आपले वेगळेपण दाखवून दिले.श्रीलंका दौऱ्यावरही जेव्हा प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता तेव्हा धोनीने मैदानात आरामात झोपून घेतले होते. तसेच काहीसे दृश्य यावेळी चेन्नई विमानतळावर पाहायला मिळाले.
दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ कोलकात्यात दुसरा वनडे सामना हा कोलकात्यातील इडन गार्डन मैदानावर २१ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष असणाऱ्या सौरव गांगुलीने दुसऱ्या वनडेसाठी कोलकाता सज्ज असल्याचं यापूर्वीच घोषित केलं आहे. चेन्नई प्रमाणेच येथेही हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भारतीय संघाने सफेद रंगाचे टी- शर्ट्स घातले होती. यावेळी सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षक रवी शास्त्री बरोबर खेळाडूंनी हॉटेलवर जाऊन विश्रांती घेणं पसंत केलं. भारतीय संघ आज कोणताही सराव करणार नसल्याचं यावेळी विमानतळावरच संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. भारतीय संघ बरोबर ३ वाजून ३० मिनिटांनी चार्टर विमानाने कोलकाता येथे पोहचला.
पहिल्या सामन्यात भारताची सरशीअष्टपैलू हार्दिक पांड्या (८३) व अनुभवी महेंद्रसिंह धोनी (७९) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या ११८ धावांच्या निर्णायक भागीदारीनंतर गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमाद्वारे आॅस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला. यासह भारताने ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद २८१ धावा उभारल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार २१ षटकांत १६४ धावांचे आव्हान मिळाले. भारताने ऑसीला ९ बाद १३७ असे रोखत बाजी मारली. अर्धशतक झळकावल्यानंतर २ महत्त्वपूर्ण बळी घेणा-या हार्दिकला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.