नवी दिल्ली : परस्पर हितंबंधांमुळे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारताच्या युवा (१९-वर्षांखालील) संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांना यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होता आले नव्हते. पण बीसीसीआय आता नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत असून त्यानुसार द्रविड आणि शास्त्री यांना आयपीएलमध्ये सहभागी होता येऊ शकते.
द्रविड हा गेल्यावर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा प्रशिक्षक होता, तर शास्त्री हे समालोचन करत होते. पण सध्याच्या घडीला हे दोघेही भारताच्या विविध संघांचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत. त्यामुळे लोढा समितीच्या नियमांनुसार या दोघांना यंदाच्या आयपीएलमध्ये कोणतीही भूमिका वठवता आली नव्हती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुढच्या वर्षी नियमांमध्ये बदल करण्यात येणार असून या दोघांना आयपीएलमध्ये सहभागी होता येणार आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांनी याबाबत सांगितले की, " बीसीसीआयची प्रशासकिय समिती आयपीएलच्या नियमांमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे. जर या प्रशासकिय समितीने नियमांमध्ये बदल केले तर शास्त्री आणि द्रविड यांना आयपीएलच्या पुढच्या मोसमात समालोचन करता येणार आहे. हे दोघेही भारताच्या विविध संघांचे प्रशिक्षक आहेत, त्यामुळे ते आयपीएलमध्ये प्रशिक्षण देऊ शकत नाही, पण ते समालोचन मात्र करू शकतात, असे प्रशासकिय समितीला वाटत आहे. "