जोहान्सबर्ग : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अंजिक्य रहाणे यांच्यापाठी भक्कमपणे उभे राहिले आहेत. रहाणे आणि पुजारा यांना आम्ही संघात शक्य तेवढी संधी देऊ, असे संकेत राहुल द्रविड यांनी दिले आहेत. त्यामुळे हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यासारख्या फलंदाजांना अंतिम ११ चा भाग बनण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.
धैर्याने फलंदाजी करणाऱ्या विहारीने १३ पैकी फक्त एकच कसोटी सामना मायदेशात खेळला आहे. कर्णधार विराट कोहली हा पाठदुखीने, तर अय्यर पोट खराब असल्याने खेळू शकला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत विहारीला संधी मिळाली. विहारीने दुसऱ्या डावात नाबाद ४० धावा केल्या. त्याने त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. द्रविड यांनी विहारीचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, विहारीने दोन्ही डावात चांगला खेळ केला. पहिल्या डावात भाग्याने त्याची साथ दिली नाही. दुसऱ्या डावात त्याने चांगली फलंदाजी करीत संघाचे मनोबल वाढविले.
मधल्या फळीतील अन्य फलंदाज श्रेयस अय्यर याचेदेखील त्यांनी कौतुक केले आहे. द्रविड यांनी म्हटले की, श्रेयसने या आधी दोन-तीन सामन्यांत असे केले आहे. त्याला संधी मिळत आहे. तो चांगले प्रदर्शन करीत आहे आणि आशा आहे की त्याची देखील वेळ येईल.’मात्र याचा हा अर्थ नाही की त्याला रहाणे आणि पुजाराऐवजी प्राथमिकता दिली जाईल. कारण पुढच्या सामन्यात कोहलीचे पुनरागमन निश्चित आहे.
याबाबत द्रविड यांनी स्पष्ट केले की, जर काही खेळाडूंकडे पाहिले तर लक्षात येईल की या वरिष्ठ खेळाडूंनादेखील वाट बघावी लागली होती. त्यांनी त्याच्या कारकिर्दीत सुरुवातीला खूप धावा केल्या होत्या. मात्र, वाट बघावी लागते, विहारीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि संघाचे मनोबलदेखील वाढायला हवे.
फटक्यांच्या निवडीबाबत पंतने अधिक सजग राहण्याची गरजदक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंत बेजबाबदारपणे फटका मारुन बाद झाला होता. यासंदर्भात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकारांसमोर ऋषभ पंतबद्दल काही सूचक विधाने केली आहेत. पंत जेव्हा फलंदाजीस आला त्यावेळी भारतीय संघाला शांत आणि संयमी खेळीची गरज होती. पण आफ्रिकेच्या काही खेळाडूंशी त्याचा वाद झाला. त्यात त्याने विचित्र फटका खेळून आपली विकेट बहाल केली. याच मुद्द्यावर राहुल द्रविडने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. “ पंत हा सकारात्मक क्रिकेट खेळण्यात पटाईत आहे. झटपट धावा जमवण्यावर त्याचा विश्वास आहे. त्याची फलंदाजीची एक विशिष्ट शैली आहे.
त्याच शैलीच्या जोरावर त्याने आतापर्यंत अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. पण नेहमी तसा खेळ योग्य नसल्याने मी लवकरच त्याच्याशी संवाद साधणार आहे. त्याची फलंदाजी चुकीची नाही, पण फटका खेळण्याची वेळ चुकते आहे. त्याबद्दल पंतशी बोलणं आवश्यक आहे आणि ते मी लवकरच करेन.” असे द्रविड म्हणाले. पंतच्या बेजबाबदार फलंदाजीसाठी त्याच्यावर सध्या सर्वच स्तरातून टीका होते आहे. याबाबत बोलताना द्रविड पुढे म्हणाले, “सकारात्मक खेळ करू नको किंवा आक्रमक खेळ करू नको, असं ऋषभ पंतला कोणीही सांगणार नाही. पण काहीवेळा जो फटका आपण खेळणार आहोत, त्याची गणितं नक्की कशी आहेत, ते लक्षात घेतलं पाहिजे. फटक्याची निवड आणि तो खेळण्याची वेळ दोन्ही गोष्टींचं फलंदाजाला भान असायला हवं.”
सिराजचे तिसऱ्या कसोटीत खेळणे संदिग्धभारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या मांसपेशीत दुखापत झाली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात त्याचे खेळणे संदिग्ध आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दुसरा कसोटी सामना संपल्यावर सांगितले की, सिराज पूर्णपणे तंदुरुस्त नाही. दुसऱ्या सामन्यात हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाल्याने तो संपूर्ण सामन्यात फक्त १५.५ षटकेच गोलंदाजी करू शकला. दुसऱ्या डावात त्याला फक्त सहाच षटके टाकता आली. द्रविडने सांगितले की,‘सिराज पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि आम्हाला पुढे जाताना त्याच्या दुखापतीचे आकलन करावे लागेल. जर तो पुढच्या चार दिवसात तंदुरुस्त होईल की नाही, हे फिजिओच सांगू शकतील.’ प्रशिक्षकांनी सांगितले की, दुखापत असतानाही त्याने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या डावात तो पूर्ण तंदुरुस्त नव्हता. आमच्याकडे पाचवा गोलंदाज होता. मात्र आम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकलो नाही. त्यामुळे आमची रणनीतीच प्रभावित झाली. जर सिराज तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही तर उमेश यादव किंवा ईशांत शर्मा यापैकी एकाला अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते. हनुमा विहारीदेखील दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. द्रविडने सांगितले की, हनुमा विहारीच्या दुखापतीच्या बाबतीत फिजिओसोबत विस्तृत चर्चा झालेली नाही.
विराट लवकरच तंदुरुस्त होईलतिसऱ्या कसोटीत विराट खेळणार का? याबद्दलच्या चर्चा रंगल्या असताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. विराट कोहली लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होईल असा अंदाज आहे. त्याला सराव करायला आणि व्यायामाला थोडा जास्त कालावधी मिळाला आहे. केपटाऊनला जाऊन दोन सराव सत्रात खेळला की विराट अधिक फिट होईल. मी विराटसोबत सतत संपर्कात आहे. तंदुरूस्तीबाबत मी त्याच्याशी बोलतो आहे. येत्या चार दिवसांत विराट नक्कीच तंदुरुस्त होऊ शकतो.