भारताचा माजी वर्ल्ड चॅम्पियन कोच राहुल द्रविड पुन्हा एकदा आयपीएलमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. तो आगामी आयपीएल २०२५ च्या हंगामा आधी राजस्थान रॉयल्सचा संघ या दिग्गजाकडे प्रशिक्षकाची मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण फ्रँचायझी किंवा राहुल द्रविड यांच्याकडून यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जर फ्रँचायझीला द्रविडनं होकार दिला, तर तो राजस्थानच्या संघाला दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावून देण्यासाठी रणनिती आखताना दिसू शकतो.
चर्चा अगदी अंतिम टप्प्यात
पीटीआयच्या वृत्तानुसार, द्रविड आगामी २०२५ आयपीएल हंगामात राजस्थान संघाच्या मार्गदर्शकाच्या रुपात दिसू शकतो. एका विश्वसनीय सूत्राच्या हवाले दिलेल्या वृत्तामध्ये पीटीआयने म्हटले आहे की, राजस्थान रॉयल्स आणि राहुल द्रविड यांच्यातील चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आहे. तो लवकरच संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारताना दिसेल.
द्रविड अन् राजस्थान रॉयल्स यांच्यात खास कनेक्शन
राहुल द्रविड याआधी देखील आयपीएलमधील फ्रँचायझी संघ राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून दिसला आहे. २०१२ आणि २०१३ च्या हंगामात त्याने या संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतरच्या दोन हंगामात तो संघाच्या मेंटॉरच्या रुपात दिसला होता. आयपीएलच्या आतापर्यंतच्या हंगामात राजस्थानचा संघ फक्त एकदा चॅम्पियन ठरला आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील संघाने २००८ च्या पहिल्या वहिल्या हंगामात जेतेपद पटकावले होते. राजस्थानचा संघ हा युवा खेळाडूंना अधिक पसंती देणाऱ्यांपैकी एक आहे. द्रविड या संघाशी कनेक्ट झाला तर संघासाठी तो मोठा फायद्याच असेल.
टीम इंडियातील कार्यकाळ संपल्यापासून द्रविड चर्चेत
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडनं मजेशीर अंदाजात मी बेरोजगार झालोय, असे वक्तव्य केले होते. आयपीएलमध्ये अनेक फ्रँचायझी त्याला मोठं पॅकेज देऊन संघासोबत जोडण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. गंभीरनं त्याची जागा घेतल्यानंतर द्रविड आयपीएलमध्ये त्याच्या जागेवर कोलकाता नाइट रायडर्समध्ये दिसेल, अशी चर्चाही रंगली होती.