सचिन कोरडे : स्वप्नातलं सोडा पण नशिबात असलेलं मिळतं जरुर. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय अंध क्रिकेट संघाचा कर्णधार अजय रेड्डी. एका अपघातात अजयने आपला डावा डोळा गमावला. त्याचं सैनिक बनण्याचं स्वप्न नियतीनं हिरावून घेतलं. पण लढवैय्या अजयने झुंज दिली आणि आज तो भारतीय अंध क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार बनला. आज तो इतरांचा आदर्श बनत आहे. क्रिकेटमधील आपली ही एन्ट्री अशीच अपघातासारखी आहे, असे अजय सांगतो. त्याचा आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, बिनधास्तपणा आणि समाधान हे प्रत्येकाला मोठा संदेश देऊ न जाते.
गोवा क्रिकेट संघटनेच्या जीसीए मैदानावर सध्या भारत, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील त्रिकोणीय अंध टी-२० मालिका खेळविण्यात येत आहे. या निमित्त अजय गोव्यात आला आहे. सामन्याच्या ‘ब्रेक’ मध्ये अजय आपल्या सहकाºयांसोबत बोलत होता. खुर्चीवर बसलेला हा तरुण खेळाडू मैदानाकडे चेहरा करून बसला पण त्याच्या ‘नजरा’ प्रतिस्पर्धी श्रीलंकन संघाच्या खेळाडूंवरच होत्या. उत्तम खेळाबद्दल अभिनंदन केल्यानंतर अजय खुलत गेला. तो म्हणाला, २०१० पासून मी भारतीय क्रिकेट संघात आहे. २००२ मध्ये मी अंध क्रिकेटबाबत ऐकले होते. तेव्हा आपणही क्रिकेट खेळावे असे वाटले. त्यानंतर सराव केला. २००६ मध्ये राज्य संघात निवड झाली. मग आनंद वाटला. त्यानंतर मला भारतीय संघात संधी मिळाली. आज देशाचे प्रतिनिधीत्व करतोय. याचा खूप अभिमान वाटतो.
मला लहानपासून वाटायचे की देशसेवा करायची होती. सैनिक व्हायचे होते. परंतु, हे स्वप्न माझ्यापासून दुरावले गेले. पहिली ते ६ वीपर्यंत माझे डोळे चांगले होते. अगदी तुमच्यासारखेच. सहावीत असताना माझ्यासोबत दुर्दैवी घटना घडली. गुंटूर जिल्ह्यात माझे गाव आहे. या गावात वीज गेलेली आणि त्या दिवशाी मला झोपही येत नव्हती. पहाटे ४ वाजता उठून बसलो. दाराची कडी बाहेर आलेली होती ती मला दिसली नाही. ती सरळ माझ्या डोळ्यात खुपसली गेली. जबर धक्का होता तो. प्रचंड निराशेत होतो. सर्व काही संपल्यासारखे वाटू लागले होते. आॅपरेशन केले, मात्र ते फेल झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला शाळेत मी सर्वात मागच्या बेंचवर बसायचो. तेव्हा सगळं दिसत होतं. डोळा गमावल्यानंतर मात्र पहिल्या बेंचवरूनही दिसत नव्हतं. डॉक्टरने माझ्या आईवडिलांना याला नियमित शाळेत घालू नका, असा सल्ला दिला. त्यानंतर मी अंध शाळेत शिकलो. देशाची सेवा करता आली नाही, मात्र देशाकडून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. एक संधी हुकली की दुसरी संधी चालून येते हे खरेच आहे. मी सध्या आनंदी आहे आणि देशाकडून खेळण्याचा अभिमान आहे. पाच वेळा विश्वचषक खेळणारा अजय हा एकमेव भारतीय अंध क्रिकेटपटू आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने नुकताच दुबईतही तिरंगा फडकविला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत तो माहीर आहे.
सरकारी दरबारी प्रस्ताव टांगणीवरच..
आम्ही चार वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकलो आहे. अंध क्रिकेटमधून आम्ही देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे. मात्र, सरकार पातळीवर अंध क्रिकेटला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आमच्या संघटनेने सरकारकडे आणि बीसीसीआयकडे मान्यतेचा प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र, त्यावर सरकार तसेच बीसीसीआयकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. आमची संघटना वैयक्तिक पातळीवर स्पर्धेसाठी खर्च करते. बीसीसीआयकडून आम्हाला कोणताही निधी मिळत नाही. अंध क्रिकेटसाठी त्यांच्याकडून कोणतीच मदत मिळत नाही. बीसीसीआय आणि सरकारने खेळाडूंची दखल घ्यावी, असे वाटते. तसे झाल्यास इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.
धोनी आमच्या कल्पनेतच
ज्यांचा आपण आदर्श घेतो त्यांना उघड्या डोळ्याने पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाचीच असते. हे स्वप्नवत असतं. पण आम्ही आमच्या आदर्श खेळाडूंना आमच्या कल्पनेत सामावून घेतले आहे. महेंद्रसिंग धोनीला पाहिले नसले तरी तो कशा पद्धतीने खेळत असेल याची कल्पना करू शकतो. त्याचा हेलिकॉप्टर शॉट्सही आम्ही मारू शकतो, असे आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश या १८ वर्षीय खेळाडूने सांगितले. मी लहान होतो तेव्हा सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यांना टिव्हीवर पाहिले होते. त्यानंतर मात्र अपघातात डोळे गेले. धोनीला पाहता आले नाही याची खंत वाटते.
अंध क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल
आम्ही पाच वेळा विश्वचषक जिंकलो आहे. सध्या भारत अंध क्रिकेटमध्ये अव्वल संघ आहे. मात्र, सरकारकडून त्याची दखल घेतली गेली नाही. सरकारकडून मदतीचे आश्वासन मिळत आहे. त्यांच्या पातळीवर कामे सुरू आहेत. बीसीसीआय व इतरांनी मदत करावी, असे वाटते. तरीही आम्ही त्याचा विचार करीत नाही. केवळ देशाचा झेंडा फडकवण्याची संधी मिळते. तो क्षण खूप मोठा वाटतो. क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान द्यावे, असे वाटते. एक टीम म्हणून जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा सुद्धा खूप प्रेरणा मिळते. मला पाकिस्तानविरुद्ध खेळताना मजा येते. २०१२ मधे मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो होतो. तेव्हा मी ३ बळी घेतले होते, असे पंकज भोई याने सांगितले.
चेंडूच्या आवाजाकडे ‘नजरा’
अंध क्रिकेटपटू कसे खेळत असतील, हा प्रश्न अनेकांना पडतो. पण त्याचे उत्तर मैदानात गेल्यावरच मिळते. ब्लार्इंड क्रिकेट असोसिएशनने यावर मोठे संशोधन केले. त्यानुसार, या खेळाडूंसाठी काही नियमही तयार केले. या क्रिकेटसाठी विशेष चेंडू वापरला जातो. या चेंडूंतून घुंगरासारखा आवाज येतो. याच आवाजावरून खेळाडू चेंडूकडे धाव घेतात. त्यावर फटका मारतात. पांढºया रंगाचा हा चेंडू १३० ग्रॅमचा असतो. चेंडूंच्या आवाजामुळे आम्हाला चेंडू कोणत्या दिशेने आणि किती वेगाने जात आहे, याची कल्पना येते, असे अजयने सांगितले.
Web Title: The dream was enter in the army but he was in indian cricket team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.