इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दणदणीत विजयाची नोंद करताना गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना KKR ने ९८ धावांनी जिंकला. कोलकाताच्या ६ बाद २३६ धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ १६.१ षटकांत १३७ धावांत तंबूत परतला. या सामन्यानंतर कोलकाताचा संघ पुढील सामना घरच्या मैदानावर ११ मे रोजी घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यासाठी ते लखनौवरून चार्टर्ड फ्लाईटने कोलकाताच्या दिशेने निघाले, परंतु त्यांच्या विमानाला तिथे लँडिंगची परवानगी नाकारली गेली आणि विमान गुवाहाटीकडे वळवले गेले.
इकाना स्टेडियमवर पहिल्यांदाच कोणत्याही ट्वेंटी-२० सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारली गेली. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौकडून एकाही फलंदाजाला छाप पाडता आली नाही. दुसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने अर्शिन कुलकर्णीला बाद केल्यानंतर कोलकाताने ठरावीक अंतराने बळी घेत लखनौचा पराभव स्पष्ट केला. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याआधी, फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांच्या वादळी सलामीच्या जोरावर कोलकाताने भक्कम धावसंख्या उभारली. नरेनने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वेगवान गोलंदाज नवीन उल हकने ३ बळी घेतले.
कोलकात्यावरील खराब हवामानामुळे KKRचे चार्टर्ड फ्लाईट गुवाहाटीकडे वळवण्यात आले होते आणि संघ तिथे दाखल झाला होता. पण, काही तासानंतर त्यांना कोलकाता येथे उतरण्यास परवानगी मिळाली आणि ते गुवाहाटी येथून निघाले आहेत. साधारण ११ वाजता ते कोलकाता येथे पोहोचतील, अशी माहिती समोर येत आहे.
प्ले ऑफचं गणित... ११ सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्सनेही ८ विजय मिळवून सरस नेट रन रेटच्या जोरावर १६ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. पण, त्यांना उर्वरित ३ सामन्यांत किमान एक विजय मिळवणे गरजेचा आहे. त्यांना उर्वरित सामन्यात राजस्थान रॉयल्ससह ( १९ मे) मुंबई इंडियन्स ( ११ मे) व गुजरात टायटन्स ( १३) यांचा सामना करायचा आहे आणि यापैकी दोन सामने ते नक्की जिंकतील असा त्यांचा फॉर्म आहे.