भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने मागील वर्षभराच बरेच चढ उतार पाहिले... दुखापतीमुळे त्याला काहीकाळ क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते, त्यानंतर बीसीसीआयने त्याला वार्षिक करारातून वगळले, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करूनही ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी त्याचा विचारही झाला नाही... असे असतानाही श्रेयस न खचता आपलं काम करत राहिला. त्याने मुंबई संघासोबत रणजी करंडक उंचावला आणि इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व सांभाळताना जेतेपद पटकावून दिले.
श्रेयस अय्यरने भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ११ सामन्यांत ६६.२५च्या सरासरीने ५३० धावा केल्या आणि त्यात २ शतकं व ३ अर्धशतकांचा समावेश होता. त्यानंतर तो भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे मालिकेसाठी गेला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेतही तो खेळला. जानेवारी-फेब्रुवारी २०२४ मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळला. पण, त्यानंतर BCCI ने राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे असा सल्ला दिला होता. मात्र, श्रेयसने काही कारणास्तव रणजी करंडक स्पर्धेत सहभाग घेतला नाही आणि त्याचा परिणाम त्याला वार्षिक करारातून हात धुवावे लागले.
BCCI च्या कारवाईनंतर श्रेयस रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून काही सामने खेळला आणि जेतेपद पटकावणाऱ्या संघाचा सदस्य बनला. त्यानंतर आयपीएलमध्ये KKR ला १० वर्षांनी जेतेपद मिळवून दिले. या सर्व प्रवासाबद्दल आज अय्यर त्याच्या यू ट्युब चॅनेलवर व्यक्त झाला. तो म्हणाला,"मी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर मला विश्रांती घ्यायची होती, माझ्या शरीरावर काम करायचे होते आणि विशिष्ट क्षेत्रांभोवती माझी ताकद वाढवायची होती. संवादाच्या अभावामुळे, असे काही निर्णय होते जे माझ्या बाजूने गेले नाहीत. पण, मला माझ्या कामगिरीतून या सर्वांवर उत्तर द्यायचे होते. मला माहित होते की मी एकदा रणजी ट्रॉफी आणि आयपीएल जिंकले, तर ते सर्वांना योग्य उत्तर असेल. सर्वकाही तसेच घडले, याचा आनंद आहे. भविष्यात आणखी ट्रॉफी जिंकायच्या आहेत.''