जयपूर : सवाई मानसिंग स्टेडियममधील आठवणींना उजाळा देत सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी गुरुवारी भावुक झाला. याच मैदानावरून माझ्या कारकिर्दीला नवे वळणं मिळाले. त्यामुळे हे मैदान माझ्या हृदयाच्या खूप जवळ असल्याचे धोनी म्हणाला. यावेळी त्याने पहिल्या नोकरीपासून विश्वचषक विजयापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला.
धोनीचे हे शब्द चाहत्यांना अधिक विचार करायला भाग पाडत आहेत की, हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल का? पराभवानंतर बोलताना धोनी पुढे म्हणाला, ‘पहिले एकदिवसीय शतक करण्यासाठी मला दहा सामने लागले, पण याच खेळपट्टीवर मी श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा केल्या. या खेळीमुळे टीम इंडियात स्थान पक्के झाले होते.’ ३१ ऑक्टोबर २००५ रोजी धोनीने लंकेविरुद्ध १४५ चेंडूत १५ चौकार आणि दहा षटकारांसह नाबाद १८३ धावा कुटल्या होत्या.
सीएसकेने आठ सामने खेळले आहेत, पण यंदाच्या हंगामानंतर धोनी निवृत्त होणार असल्याची चर्चा आहे. हा संघ जिथे सामना खेळतो तिथे स्टेडियम पिवळ्या रंगात रंगून जात आहे. यामागे एकमेव कारण आहे, ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. पण चेन्नईत शेवटचा सामना खेळल्यानंतर धोनी आयपीएलला अलविदा करेल, असे मानले जात आहे. खरगपूर येथे रेल्वेत टीसी म्हणून पहिली नोकरी ते २ एप्रिल २०११ ला वानखेडेवरील विश्वविजेता चषक उंचाविणारा कर्णधार ही वाटचाल स्वत:च्या शब्दात धोनीने मांडली, हे विशेष.