नवी दिल्ली - भारताच्या शेजारील श्रीलंका देशावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. या आर्थिक संकटाचा फटका श्रीलंकेतील सर्वसामान्य जनतेपासून क्रिकेटपटूंना देखील बसत आहे. देशात अराजकता माजली आहे, महागाईने जनता त्रस्त आहे त्यात इंधनाची खूप कमतरता भासत आहे. २०१९ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा श्रीलंकेचा क्रिकेटर चमिका करुणारत्ने याचे देशात असलेल्या पेट्रोलच्या कमतरतेमुळे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे तो त्याच्या नियमित प्रॅक्टिस सेशनला हजेरी लावू शकत नाही. तब्बल दोन दिवस रांगेत उभे राहिल्यानंतर त्याला पेट्रोल मिळालं आहे.
वृत्तवाहिनी एएनआयशी संवाद साधताना त्याने देशातील बिकट परिस्थितीवर भाष्य केले. "सुदैवाने तब्बल दोन दिवस रांगेत उभे राहिल्यानंतर पेट्रोल मिळालं, इंधनाच्या प्रचंड तुटवड्यामुळे मी रोजच्या सरावालाही जाऊ शकत नाही, असे त्याने सांगितले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच श्रीलंका एवढ्या मोठ्या इंधनाच्या संकटाचा सामना करत आहे. विशेष म्हणजे अलीकडेच लंका प्रीमियर लीगच्या दोन सामन्यांची घोषणा झाली आहे.
तब्बल २ दिवसांनी मिळालं पेट्रोलदरम्यान, श्रीलंकेकडे ऑगस्टमध्ये आशिया कपचे यजमानपद असणार आहे, याशिवाय देशातील टी-२० लीगची तारीख देखील जवळ येत आहे. करुणारत्ने म्हणाला, "आशिया कप तोंडावर आहे आणि लंका प्रीमियर लीगची देखील घोषणा झाली आहे. मला माहिती नाही काय होईल कारण मला सरावासाठी कोलंबो आणि विविध ठिकाणी जायचं आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे सरावाला जाऊ शकत नाही. मी केवळ दोनच दिवस सरावाला जाऊ शकलो आहे कारण दोन दिवस पेट्रोलच्या रांगेमध्ये होतो. आज सुदैवाने पेट्रोल भेटलं आहे मात्र दहा हजार रुपयांचे हे पेट्रोल दोन ते तीन दिवसच टिकू शकेल."
आशिया कपसाठी श्रीलंका सज्जआगामी आशिया कप २०२२ साठी श्रीलंकेच्या संघाची तयारी असल्याचं चमिकाने म्हटलं. मात्र सध्या ओढावलेल्या संकटामुळे तो व्यथित आहे. त्याने सांगितले की "आम्ही आशिया कपसाठी तयार आहोत आणि मला वाटतं की मोठ्या आयोजनासाठी देश पुरेसे पेट्रोल उपलब्ध करेल. आम्ही अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळलो आहे आणि चांगले सामने पार पडले." लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियानंतर पाकिस्तानचा संघ देखील श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान या दौऱ्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.